मुंबई : पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छतागृहांच्या देखभालीवर भर दिला जाईल तसेच अधिक पैसे आकारण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत गेल्यावर्षी सात कंत्राटे रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
Worli : वरळी अस्फाल्टसह छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या जागेचाही होणार लिलाव
रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला असून, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी व्यापक पावले उचलण्याचे ठरवले आहे. पे अँड युज संकल्पनेंतर्गत चालवली जाणारी स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी अधिक स्वच्छ, सुसज्ज आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार आहे.
स्थानकांवरील अनेक स्वच्छतागृहांत प्रवाशांकडून नियमानुसार शुल्क न घेता अधिक पैसे वसूल केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई करीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने २०२४ मध्ये ७० स्थानकांवरील तपासणीदरम्यान सात कंत्राटे रद्द केली. तसेच जादा शुल्क आकारणाऱ्या कंत्राटदारांकडून तब्बल २१.५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर नियमभंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून ११.५६ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.