मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी आणि लाकडी ओव्हनद्वारे स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे. किचनमध्ये कोळसा भट्टी ऐवजी इलेक्ट्रिकल उपकरणं, पीएनजी, एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. महापालिकेने रितसर नोटी बजावून बंदीची माहिती हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांच्या व्यवस्थापनाला दिली आहे.
मुंबई महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांना सात जुलै २०२५ पर्यंत कोळसा तंदूर भट्टींच्या जागेवर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयाचे पालन केले नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका कारवाई करत आहे. यामुळे कोळसा तंदूर भट्टीबाबतच्या नियमाचे उल्लंघन केल्यास व्यवसाय करण्याचा परवाना रद्द होऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांना दिला आहे.