पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोनदिवसीय अमेरिका दौऱ्याकडे केवळ भारताचे नव्हे, तर जगभरातील प्रमुख देशांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या दौऱ्यात गुरुवारी स्नेहपूर्वक भेट झाली. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या भेटीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी मोदींच्या अनुपस्थितीवरून नाके मुरडणाऱ्यांची तोंडं आता गप्प झाली असतील. या भेटीत मोदी यांच्यावर दाखवलेला विश्वास हा ट्रम्प-मोदी यांच्या मैत्रीचे पर्व पुढे अबाधित राहील हे नव्याने सांगायला नको. त्याचा प्रत्यय बांगलादेश संदर्भात ट्रम्प यांनी दिलेल्या एका उत्तरातून स्पष्ट होते. या दोघांच्या बैठकीत बांगलादेशाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली. त्यावेळी बांगलादेशातील संकटासंबंधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगून टाकले की, बांगलादेशाचा निर्णय मोदी घेतील. बांगलादेशाबाबत काय करायचे ते मोदी ठरवतील. तसेच, वॉशिंग्टन येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार आणि भारत-अमेरिका संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिकी दौरा खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे. २० जानेवारी २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्हाईट हाऊसने आयोजित केलेल्या अधिकृत कामकाजाच्या दौऱ्यानुसार मोदी हे चौथे परदेशी नेते आहेत. पदभार स्वीकारल्यापासून ट्रम्प यांनी फक्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांची भेट घेतली आहे. ट्रम्प यांचे लक्ष त्यांच्या देशांतर्गत अजेंड्यावर आहे. ट्रम्प यांनी अलीकडे अमेरिकी उद्योगांच्या संरक्षणासाठी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांना फटका बसला आहे.
मोदींच्या या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प एक मोठी गोष्ट भारताला द्यायला तयार झालेत, ते म्हणजे अमेरिकेचे महाशस्त्र भारताला मिळणार आहे. त्यामुळे चीन-पाकिस्तानवर मोठी जरब बसेल. या आधीपासून भारत हा रशिया, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशांकडून सर्वात जास्त शस्त्रास्त्र खरेदी करतो. त्यात रशिया आणि फ्रान्स या दोन देशांशी भारताचे जुने संरक्षण संबंध आहेत. मागच्या काही वर्षांत भारताने अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी वाढवली आहे. अमेरिकेकडून टेहळणी विमान आणि अन्य संरक्षण साहित्य भारताने विकत घेतले आहे. पण मोदींच्या या दौऱ्यात अमेरिकेने भारताला एफ-३५ देण्याची तयारी दाखवली आहे. एफ-३५ हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात घातक फायटर विमान समजले जाते. एफ-३५ हे पाचव्या पिढीत स्टेल्थ फायटर विमान आहे. रडारलासुद्धा हे विमान सापडत नाही. अत्यंत अचूक वार करण्याची या लढाऊ विमानाची क्षमता आहे. त्यामुळे असं शस्त्र आपल्याकडे असणं फायद्याचे आहे.
भारताला स्वत:ला पाचव्या पिढीचे फायटर विमान बनवायला अजून वेळ लागणार होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एफ-३५ देण्याची दाखवलेली तयारी एक मोठी बाब मानायला हरकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल केलेल्या विधानामुळे भारताची शत्रू राष्ट्रे बुचकळ्यात पडली असतील. ते म्हणाले की, “यावर्षी आम्ही भारताला काही अब्ज डॉलर्सची सैन्य साहित्य विक्री वाढवणार आहोत. आता आम्ही भारताला एफ-३५ स्टेल्थ फायटर देण्याचा मार्ग सुद्धा प्रशस्त करत आहोत. मोदी यांच्या भेटीत आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, मुंबईवर २००८ साली झालेल्या २६/११ हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. त्याला न्यायाचा सामना करावा लागेल असे ट्रम्प म्हणाले. मुंबई हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. मागच्या महिन्यात तहव्वुर राणाचं भारताला प्रत्यार्पण करण्यास अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाई बिझनेसमन तहव्वुर राणाने २००८ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
मोदी आणि ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंध सर्वश्रुत आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये ह्युस्टनमधील हाऊडी कार्यक्रमात मोदींच्या भेटीपासून आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीची चर्चा झाली होती. तसेच, दोन्ही नेत्यांनी चीन आणि कट्टरपंथी इस्लामला अस्तित्वाचे धोके म्हणून पाहिले आहे. दोघेही त्यांच्या कणखर नेतृत्वशैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मोदींचा अमेरिका दौरा दोन्ही देश आणि त्यांचे द्विपक्षीय संबंध जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. परराष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून अभ्यास केला, तर अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये भारताचे एक वेगळे स्थान आहे. त्याला अमेरिकेकडून महत्त्वाचा धोका म्हणून कधीच पाहिले जात नाही किंवा पारंपरिक मित्र म्हणूनही पाहिले जात नाही. चीन जसा भारताला प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो, तसे अमेरिकेच्या बाबतीत घडत नाही. रशिया, यूके, जपान यांसारखे देश जे भारताचे दीर्घकाळापासून मित्र आहेत. मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीपर्वामुळे भारताच्या मित्र राष्ट्राच्या यादीत भविष्यात भर पडली, तर आश्चर्य वाटायला नको.