१२२ कोटीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप
मुंबई : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी (New India Bank Scam) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना अटक केली आहे. हितेश मेहतांवर दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. हाच गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हितेश मेहतांवर न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या दादर व गोरेगाव येथील शाखेतून १२२ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
हितेश मेहता यांच्यावर १२२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हितेश मेहता यांनी दादर आणि गोरेगाव येथील बँकेच्या शाखेतून गैरव्यवहार करत तब्बल १२२ कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता, त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी आणि टीडीएसबाबत आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. त्याने प्रभादेवी शाखेतून ११२ कोटी तर गोरेगाव शाखेतून १० कोटी रुपये गायब केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत बँकेच्यावतीने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेहता बरोबर आणखी ही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वतःच्या तेराव्याला झाले हजर!
या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. या प्रकरणात हितेश मेहता यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर अटक करण्यात आली आहे. आरबीआयने दोन दिवसांपूर्वीच या बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले होते.
दरम्यान, न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ३० पेक्षा जास्त शाखा आहेत. बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
न्यू इंडिया बँकेबाहेर ठेवीदारांचा आक्रोश
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन कर्ज वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घालल्याने आता ठेवीदारांनी बँकेच्या शाखांबाहेर जमून आक्रोश सुरू केला आहे. आमच्या ठेवी परत द्या अशी विनंती ठेवीदार करत होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. आपल्या ठेवींचे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर होता. परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून फक्त आश्वासने दिली जात होती. अनेक ठेवीदारांचे लाखो रुपये बचत खात्यात अडकले होते. स्वत:ची जमापुंजी काढण्यासाठी परवानगी मागण्याची नामुष्की ठेवीदारांवर ओढावली आहे.