भाविकांच्या गर्दीमुळे राम मंदिर व्यवस्थापनावरील वाढला ताण
अयोध्या : १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री या काळात महाकुंभमेळा होत आहे. महाकुंभमेळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आणि या एका महिन्यात तब्बल ५० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी या अद्भूत आणि दुर्लभ योगाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर लाखो भाविक, पर्यटक अयोध्येत जाऊन राम मंदिरात (Ram temple in Ayodhya) रामललाचे दर्शन घेत आहेत.
महाकुंभमेळ्यानंतर भाविक अयोध्येत दाखल होत असल्यामुळे राम मंदिर व्यवस्थापनावरील ताण वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक भाविक अयोध्येत येत असून, राम मंदिरात रामललाचे दर्शन घेत आहेत. महाकुंभमेळ्यातून दररोज अयोध्येत येणाऱ्या भाविकांसह राम मंदिराला मिळणाऱ्या दानाचे विक्रमही मोडले जात आहेत. महाकुंभात स्नान केल्यानंतर लाखो भाविक अयोध्येकडे निघाले आहेत.
Electricity : मुंबईत होणार समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती
साधारण १४ जानेवारीपासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रंचड वाढ सुरू झाली आहे. एका महिन्यात एक कोटींहून अधिक भाविकांनी श्रीरामललाचे दर्शन घेतले आहे. राम मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे की, ट्रस्टच्या १० देणगी काऊंटरवर दररोज १० लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली जात आहे. महाकुंभाच्या १ महिन्यात १५ कोटी रुपयांहून अधिक दान जमा झाले आहे. यामध्ये रामललासमोर ठेवलेल्या ६ दानपेटीत जमा झालेल्या रकमेचाही समावेश आहे. भाविकांची गर्दी इतकी मोठी आहे की, ज्यांना दानपेटीत पैसे टाकता येत नाहीत, त्यांनी ते बाहेरच ठेवावे लागत आहे. कारण गर्दीच्या दबावामुळे लोकांना थांबायला वेळ मिळत नाही. महाकुंभाच्या आधीही मंदिरात दरमहा सुमारे ३ कोटी रुपये देणग्या स्वरूपात जमा होत होते.
देणगीची रक्कम मोजण्याची बँकेवर जबाबदारी
दान, देणगीची रक्कम मोजण्याची जबाबदारी बँकेकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. देणगीची रक्कम मोजण्यासाठी यंत्रे बसवण्यात आली आहेत. १५ बँक कर्मचाऱ्यांच्या टीममध्ये वरिष्ठ व्यवस्थापकांचा समावेश आहे. टीमचे समन्वय साधण्यासाठी मंदिर ट्रस्टच्या प्रभारी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज मोजणी केल्यानंतर, पैसे ट्रस्टच्या बँकेतील खात्यात जमा केले जातात. राम मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्याच दिवशी तब्बल ३.१७ कोटी रुपयांचे दान मिळाले. यानंतर, पुढील १० दिवसांत ११ कोटी रुपयांहून अधिक दान, देणगी मिळाली. ऑगस्ट २०२४ मध्ये राम मंदिर ट्रस्टने सांगितले होते की, ट्रस्टला देश-विदेशातून सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे देणगी मिळाले आहे.