Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजगतिमान आणि प्रगतिशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार

गतिमान आणि प्रगतिशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतिशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. या कायद्यांची राज्यात अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे, त्यासाठी निर्माण करावयाच्या संस्थात्मक आणि पायाभूत सुविधांची स्थिती काय आणि किती प्रकरणे दाखल झाली याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता असे हे तीन कायदे आहेत. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा आढावा घेतला.

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत संधी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. २७ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन रुजू झाल्या असून, पुढच्या ६ महिन्यांत संपूर्ण नेटवर्क तयार होईल. ज्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा प्रकरणात आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीच न्यायवैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे. यातून गुणवत्तापूर्ण पुरावे उपलब्ध होणार आहेत. राज्य पोलीस दलाच्या २ लाखांच्या फोर्सपैकी ९० टक्के प्रशिक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित १० टक्के प्रशिक्षण ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

आरोपींना वारंवार कोर्टात हजर करावे लागू नये, यासाठी नवीन कायद्यान्वये कारागृहात साक्षीसाठी क्युबिकल्स उभे करून ते न्यायालयाशी ऑनलाईन जोडून देण्यात येणार आहेत. प्रत्येक कोर्टाचे विशिष्ट क्युबिकल असणार आहेत. ६ ते ८ महिन्यांत हेही काम आम्ही पूर्ण करणार आहोत. पोलीस वाहन, सुरक्षेवरील ताण आणि न्यायालयातील गर्दी यामुळे कमी होणार आहे. नवीन कायद्यानुसार, वारंवार न्यायालयात तारखा मागता येणार नाही, याची तरतूद असल्याने सरकारी वकिलांना त्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. अतिशय चांगले मार्गदर्शन बैठकीत मिळाले असून हे तिन्ही कायदे लागू करण्यासंदर्भात अधिक वेगाने आम्ही काम करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

तहव्वूर राणा आहे कोण?

२६/११ चा अपराधी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिला, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी अतिशय आभारी आहे. आम्ही गेल्यावेळी तहव्वूर राणाची ऑनलाईन साक्ष घेतल्यानेच या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झाला. मुंबईवरील हल्ल्याच्या घटनेत अंतिम न्यायाची वेळ आता आली आहे. हा खटला मुंबईत चालणार असल्याने त्याला मुंबईतच आणले जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राणाला मुंबईतील कारागृहात ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, कसाबला आम्ही मुंबईतील जेलमध्ये ठेऊ शकतो, तर तहव्वूर राणा आहे कोण?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -