कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान अचानक महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखत चेन ओढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. आग विझल्यानंतर रात्री साडेदहा नंतर गाडी पुढे नेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (क्रमांक १७४१२) ला कोल्हापूर मिरज दरम्यान पंचगंगा नदीनजीक आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी )रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून महालक्ष्मी एक्सप्रेस रुकडी वळिवडे दरम्यान पंचगंगा पुलानजीक आली असता वातानुकूलित बोगीचे चाक जाम होवून रूळाशी घर्षण झाल्याने ठिणग्या उडाल्या. दरम्यान, ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवली. यावेळी गाडीचे इंजन पंचगंगा पुलादरम्यान थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, चालक आणि गार्डने ट्रेनची पाहणी केली असता एम – २ या वातानुकूलित बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. गाडीतील आग रोधक सिलिंडरने आग विझवून ती मिरजेकडे रवाना झाली. मिरजेमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एक तासाने ती मुंबईकडे रवाना झाली. ही ट्रेन रात्री साडेदहानंतर मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.