ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग ३ श्रेणी ३ या पदासाठी केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक / शिक्षक संवर्गातून ११ पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली व मुख्याध्यापक पदावर ४१ पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पदोन्नती देण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अधीक्षक सारासे श्री. बी. ए. गोमासे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव तसेच शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभाबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्याने शिक्षण विभागातील ५२ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत.