Bhajan : भजनाचा बेरंग! अश्लीलता रोखण्यासाठी आचारसंहिता लागू; भजनाचा तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा होऊ नये यासाठी कडक निर्बंध!

Share

मद्यपान करून भजन सादरीकरण करण्यास यापुढे बंदी

भजनात विक्षीप्त हातवारे, शस्त्र अन वेशभूषांवर मर्यादा

डबलबारी अन भजनांसाठी आता आचारसंहिता जारी

सिंधुनगरी (प्रा. वैभव खानोलकर) : भारूड, (Bharud) नमन, (Naman) भजन, (Bhajan) किर्तन (Kirtan) आणि दशावतार (Dashavtar) अशा लोककलांचा मोठा ठेवा जोपासणाऱ्या कोकणभूमीत अलीकडे डबलबारीच्या संगीत साजात घुसलेल्या नव्या सादरीकरण पध्दती, विडंबन तसेच टिंगलटवाळी यामुळे मुळ कलेलाच बाधा पोहोचत होती. यामुळे नवा सांस्कृतिक वाद रंगल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनाची आदर्श नियमावली लागू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या भजनी कलावंताच्या बैठकीत घेण्यात आला. भजन संस्कृतीला पुनश्च एकदा सुसंस्कृत करण्यासाठी सिंधुरत्न संगीत भजनात विक्षीप्त हातवारे, शस्त्र अन वेशभुषांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. डबलबारी अन भजनांसाठी आता आचारसंहिता जारी करण्यात आली असून भजनोत्कर्षक मंडळ, सिंधुदुर्ग यांनी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणं हे प्रत्येक डबलबारी बुवांचे कर्तव्य आहे.

या बैठकीत काही नियम भजनी बुवांसाठीही निश्चित करण्यात आले असून याच आचारसंहितेत डबलबारी सामने यापुढे केले जाणार आहेत. नव्या नियमावली प्रमाणे, महिला आणि पुरुष कोणत्याही प्रकारची डबलबारी करण्यास बंदी घालण्यात आली असून आयोजकांच्या आग्रहास बळी न पडता भजनी कला आपली संस्कृती टिकवण्यासाठी सर्वच कलावंतानी ही संहिता पाळायला हवी असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बुवांनी डबलबारी भजनात एकेरी शब्दात एकमेकांना संबोधित करू नये, एका बुवांची बारी चालु असताना दुसऱ्या बुवाने मध्ये काहीही बोलु नये. मद्यपान करून कोणत्याही बुवांनी भजन सादरीकरण करू नये. तसे आढळल्या त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५१० नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन बुवांकडून घडले तर आयपीसी २९४ कलम अंतर्गत कारवाई होणार आहे.

भजनं करताना, गॉगल लावुन, तलवार घेऊन आणि विक्षीप्त हातवारे, शिट्टी वाजवणे आदी चुकीच्या गोष्टी डबलबारी सादरीकरणात करू नये. भजनाचा ऑर्केस्ट्रा होऊ नये यासाठी रसिकांच्या मागणी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची गाणी इतर गाणी गजरात सादर करू नये. अशी आचार संहिता निश्चित करण्यात आली असून आपली संस्कृती अन परंपरा अबाधित राखण्यासाठी नवे नियम आपले कर्तव्य म्हणून जपण्याचे सर्वांनी एकमुखाने निश्चित केले आहे.

भजन महाराष्ट्राची एक समृद्ध लोकपरंपरा आहे. भजनातून जसे परमेश्वर नामस्मरण करता येते तसं भजनातून प्रदोषन सुद्धा करता येते. त्या काळच्या अनेक बुवांनी हाच भजनाचा मार्ग पत्करला आहे. भजनाला समृद्धता बहाल केली. पारंपरिक डबलबारीच्या माध्यमातून रसिकांना एक वेगळा मनोरंजना सोबत प्रबोधन करत भारूडात पुराणकथा, अध्यात्म आदी गोष्टींचा भरणा करत पारंपरिक डबलबारीने एक उत्तुंग शिखरावर भरारी घेतली. अनेक बुवा याच पारंपारिक डबलबारीतुन अजरामर झाले. मग मात्र काळ बदलला आणि पारंपरिक डबलबारी ही संकल्पना मागे पडली आणि आमनेसामने डबल बारी अर्थात ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी सुरू झाली.

बुवा एकमेकांच्या शेजारी एकाच वेळी बसू लागले आणि भजनाचा बेरंग कधी झाला हे बुवांना कळले नाही. त्यात काही महिला बुवांनी कहरच केला आणि भजन आंबट शौकीनाचे हक्काचे करमणूक केंद्र बनले. कंबरेखालचे विनोद आणि डबल मिनिंग बोलण्यातुन काही बुवांना बक्षीस स्वरुपात पैसे मिळू लागले. केवळ पैशासाठी डबलबारी आणि समोरील बुवाची जितकी लायकी उतरता येईल तितकी उतरवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. हे कमी होतं म्हणून की काय काही बुवा व्यसनाधीन होऊन भजनाचे मातेरे करू लागले. काही बुवांना तर माफीनामा सादर करण्याची नामुष्की पत्करावी लागली. कोणी बुवा लग्नाच्या होवये सादर करू लागला तर कोणी मिमिक्री सम्राट म्हणून मिरवु लागला. काही जणांनी तर भजनाचा ऑर्केस्ट्रा केला.

वीस टक्के मनोरंजन आणि ऐंशी टक्के भजन अशी परंपरा असलेले भजन आज ऐंशी टक्के मनोरंजन आणि जमलं तर दोन टक्के भजन अशा वर हे प्रमाण आले. ज्याच्या अधिक ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी, तो सर्वांत लोकप्रिय बुवा अशी समज करून घेत काही हुल्लडबाज आणि आंबटशौकीन आयोजकांच्या चक्रव्यूहात बुवा अडकले आणि दुर्दैवाने हे सगळं करण्यात बहुतांश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही बुवा आघाडीवर दिसले.. त्यांनी भजनाची ही विटंबना केवळ सिंधुदुर्ग जिल्हा पुरती मर्यादीत न ठेवता असले फालतू आणि निंदनीय प्रकार विशेष करून सिंधुदुर्गातील बुवांनी राजापूर, रामगड, मुंबईपर्यंत नेले आणि मग मात्र भजनी बुवा हा समाजाच्या टिकेचा विषय झाला.

हमरीतुमरी भाषा, वगराळ आणि असभ्य बोलण्याचे प्रमाण एवढे वाढले की, ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी कुस्तीचा आखाडा बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि एका ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारीत एक महिला बुवा चक्क एका पुरूष बुवांच्या अंगावर जाण्यासाठी हार्मोनियम सोडून उभी राहिली. सोशल मीडियासह अनेक ठिकाणी या विषयाची चर्चा रंगली.

सोशल मीडियावर निषेधाचे संदेश पडू लागले, हिच का ती भजन लोककला जी राजाश्रयासाठी प्रयत्न करतेय अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. यामुळे आता नाही तर कधीच नाही, असा विचार भजन क्षेत्रात सुरू झाला अन् पुनश्च डबलबारीला किंबहुना भजनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

यासाठीच ओरोस रवळनाथ मंदिरात तातडीची बैठक पार पडली. पण ज्यांच्यासाठी ही बैठक होती ते कुणीच या बैठकीत उपस्थित नव्हते. मग मात्र या बैठकीत काही बुवांनी वरचा स्वर लावला. ठोस उपाययोजना करण्यासाठी खलबते सुरू झाली. या बैठकीत आयोजक, वादक कलाकार, बुवा, युट्यूबर्स आणि भजन रसिक उपस्थित होते. काही बुवांनी नियम सगळ्यांना समान पाहिजे असा सुर धरला. तर काही आयोजकांनी विविध प्रश्नांची गुगली टाकत बैठकीची ताकद अजमावली. काही जण पोटतिडकीने बोलून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. तर काही जण दबक्या आवाजात काही बुवांची पाठराखण करू पाहत होते. पण शेवटी प्रश्न भजन संस्कृतीच्या अस्मितेचा होता आणि मग बैठकीत सगळ्यांचेच एक मत झाले आणि उशीरा का असेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनाची आदर्श नियमावली लागू केली गेली आणि काही नियम भजनी बुवांना घालून दिले ते पाळूनच या पुढील डबलबारी सामने केली जातील.

  • महिला आणि पुरुष कोणत्याही प्रकारची डबलबारी करण्यास बंदी (ही बंदी एक वर्षासाठी असेल मात्र नंतर विचार केला जाईल.)
  • बुवांनी डबलबारी भजनात एकेरी शब्दात एकमेकांना संबोधित करू नये अथवा ‘अरे-तुरे’ ही भाषा वापरायची बंदी आहे.
  • एका बुवाची बारी बालु असताना दुसऱ्या बुवाने मध्ये काहीही बोलू नये.
  • मद्यपान करून कोणत्याही बुवांनी भजन सादरीकरण करू नये. (वादक सुध्दा) तसे आढळल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५१० नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • आपली भजन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी भजनं करताना, गॉगल लावून, तलवार घेऊन आणि विक्षीप्त हातवारे, शिट्टी वाजवणे आदी चुकीच्या गोष्टी डबलबारी सादरीकरणात करू नये.
  • युट्युबर्स यांनी बुवांची पुर्व परवानगी घेऊनच शुटींग करावे (शुटिंग प्रसारण करताना कॅप्शन चुकीची असू नये.)
  • भजनाचा ऑर्केस्ट्रा होऊ नये यासाठी रसिकांच्या मागणी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची गाणी, किंवा इतर गाणी गजरात सादर करू नये. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन बुवाकडून घडले तर आयपीसी कलम २९४ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

थोडक्यात काय तर बिघडलेल्या भजन संस्कृतीला पुनश्व एकदा सुसंस्कृत करण्यासाठी सिंधुरत्न संगीत भजनोत्कर्षक मंडळ, सिंधुदुर्ग यांनी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणं हे प्रत्येक डबलबारी बुवांना आता बंधनकारक आहे.

खरंतर कायदे अथवा नियम तेव्हा करावे लागतात जेव्हा आपण सगळं धाब्यावर बसवून बेफिकीर वृत्तीने वागतो. जर बुवांनी स्वतःला काही मर्यादा घालून डबलबाऱ्या केल्या तर कदाचित या नियमाची गरज भासणार नाही. अर्थात आपली चुक आपल्याला कळते तेव्हा ती झाकून न ठेवता ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे मोठ्या मनाचे द्योतक आहे.

भजन संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ओरोस मध्ये ज्यांनी ज्यांनी या बैठकीला हजेरी लावली मग ते सर्वच बुवा, वादक, आयोजक, युट्यूबर्स असो वा भजन प्रेमी असो.. हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत भजन संस्कृती लोप पावणार नाही हे निश्चित!

दरम्यान, डबलबारी सामन्यासाठी नियमावली जाहीर झाल्यामुळे समाजातूनही या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

1 hour ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago