मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील महिलांना सॅनिटरी नॅपकीनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्यावतीने सामुहिक शौचालयांमध्ये २ हजार सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशिन आणि इन्सिनेटर मशिन बसवण्यात येणार आहे. महापालिकेने आतापर्यंत अशाप्रकारे २०० मशिन्स बसवून त्याची योग्य ती चाचणी केल्यानंतर २ हजार नवीन मशिन्स बसवल्या जाणार आहे.
मुंबई महापालिकेने अधिक सुलभ व सर्वसामावेशक स्वच्छता सुविधा पुरण्यासाठी सामुहिक शौचालयांमध्ये २०० सॅनिटनी पॅड वेंडींग मशिन्स बसवल्या आहेत. त्यातून ३,६०,५६५ पाकिटे वितरीत करण्यात आली आहे. याच्या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेने आणखी २००० सामुहिक शौचालयांमध्ये या उपक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. या मशिन्सवर नियंत्रण प्रणालीद्वारे देखरेख ठेवण्यात येत असून त्याद्वारे तात्काळ स्टॉक रिप्लेसमेंट केले जाते.
मुंबई महापालिकेने मुंबईतील सामुहिक शौचालयांमध्ये आयओटी आणि डेटा एनालिटिक्स आधारीत कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि इन्सिनेटर मशिनची खरेदी करण्याचा निर्णय २०२३मध्ये घेतला होता. त्यामध्ये ५ हजार मशिन्स खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. परंतु ही मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात २०० मशिन्सची उभारणी करून त्याच्या यशस्वी चाचणीनंतर उर्वरीत मशिन्स बसवण्यात येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.
महापालिकेने याला मंजुरी देताना मशिनचा पुरवठा केल्यांनतर एक वर्षांचा हमी कालावधी आणि पुढील दोन वर्षांची देखभाल करता कंत्राट बहाल केले आहे. ७६ हजार ५२८ रुपयांना एक मशिनची खरेदी करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात २०० मशिन्स बसवल्या नंतर उर्वरीत २ हजार मशिन्स या प्रत्येक झोपडपट्टीतील सामुहिक शौचालयांचा सर्वे करून बसवल्या जातील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या शौचालयांमध्ये खरोखरच गरज आहे, तसेच ज्या शौचालयांची योग्यप्रकारे संस्थेमार्फत देखभाल होते आणि जिथे योग्यप्रमाणात विजेचा पुरवठा आहे अशा सामुहिक शौचालयांमध्ये या मशिन्स प्राधान्यक्रमाने बसवण्याचा विचार केला जाणार आहे. शेवटी मशिन्सचा पुरवठा केल्यानंतर त्या मशिन्सची योग्यप्रकारे देखभाल आणि वापर होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीकोनात प्रथम सर्वे होईल आणि त्यानुसार या मशिन्सची उभारणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.