भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सांडपाण्याबर प्रक्रिया करणारे मलनिस्सारण केंद्र हे संथ गतीने काम करत आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या कायम आहे. त्यासाठी या केंद्राचे शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रायोगिक मर्यादित ) संस्थेमार्फत लेखा परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी एकूण १९ मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) आहेत. हे केंद्र जवळपास पंधरा वर्षांपूर्वी उभे करण्यात आले आहेत. मात्र शहरात भूमिगत गटार योजनेचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे हे केंद्र अपेक्षेप्रमाणे कार्यरत नाही. परिणामी अनेकवेळा दूषित पाणी प्रक्रियाविनाच खाडी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याचे आरोप पालिकेवर सातत्याने करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील मलनिस्सारण केंद्राचे ‘लेखापरीक्षण’ करून घेण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. यात समोर येणाऱ्या त्रुटींवर काम करून हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचा दावा काटकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाप्रीत संस्थेला मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण करणे, विजेची बचत करण्याच्या दुष्टीने उपाययोजना सूचवणे तसेच प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ज्ञान भागीदार आणि निधी उपलब्ध करून देण्याचे काम सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.