वसई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वसईतील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्यात येत आहे. अजूनही तालुक्यातील २ लाख ९ हजार ८७८ शिधालाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित असून त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात
आली आहे.
अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. या धान्याचे वितरण पारदर्शक रित्या होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने त्याचे वितरण १८० शिधावाटप केंद्रावर सुरू आहे. वसईत सुमारे १ लाख ४५ हजार ९०६ इतके प्राधान्य कुटुंब लाभार्थी व ३ हजार ८०६ अंत्योदय शिधापत्रिका धारक असून त्यांचे एकूण ५ लाख ९८ हजार ७० इतके शिधा लाभार्थी आहेत.
पीओएस यंत्रात आधार प्रमाणीकरण न करण्यात आल्याने अनेक शिधा लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास अडचणी येत होत्या. आता सर्वच शिधा लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचे काम ही शिधा वाटप केंद्रावर सुरू होते.
मात्र काही शिधा लाभार्थी ई-केवायसी करण्यास पुढे येत नसल्याने ते ई-केवायसी पासून प्रलंबित राहू लागले आहे. आतापर्यंत वसईत ५ लाख ९८ हजार ७० शिधा लाभार्थ्यांपैकी ३ लाख ८८ हजार १९२ लाभार्थ्यांचे ई-केवायसी झाले आहे. तर अजूनही २ लाख ९ हजार ८७८ इतके शिधा लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.
आता शासनाने ई-केवायसी करण्यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली असून प्रलंबित असलेल्या शिधा लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे असे आवाहन पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी केले आहे.