Thursday, June 19, 2025

‘तलावपाळी’ आणि नौपाड्यातील सारस्वत बँकेसमोरील फूटपाथ घेतोय मोकळा श्वास

‘तलावपाळी’ आणि नौपाड्यातील सारस्वत बँकेसमोरील फूटपाथ घेतोय मोकळा श्वास
ठाणे(प्रतिनिधी) : महापालिकेने मंजूर केलेल्या जागेऐवजी रस्त्यालगतच्या मोक्याच्या फूटपाथवर दोन टपऱ्या थाटण्याचा प्रयत्न भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी फोल ठरविला. भाजपा कार्यकर्त्यांच्या जोरदार विरोधानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास रात्रीचा खेळ करून ठेवलेल्या टपऱ्या कंत्राटदाराने हटविल्या. ठाण्याचा मानबिंदू असलेल्या ‘तलावपाळी’च्या फूटपाथ व नौपाड्यातील सारस्वत बॅंकेसमोरील फूटपाथ मोकळा करण्यात भाजपा कार्यकर्त्यांना यश आले.



सामान्य नागरिक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत स्टॉल वा टपऱ्या उभाराव्यात, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत; परंतु ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नियमावली गुंडाळून मोकळ्या जागांऐवजी चक्क फूटपाथवरच टपऱ्या बसविण्याचा घाट घातला आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला.



नौपाड्यातील सारस्वत बँकेसमोर व तलावपाळीतील फूटपाथवर काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचा लोगो असलेले स्टॉल ठेवण्यात आले. एका ठिकाणी स्टॉल मंजूर करून प्रत्यक्षात मोक्याच्या ठिकाणी स्टॉल थाटण्याचा हा उद्योग होता. पादचाऱ्यांना अडथळा होतील, असे स्टॉल वा टपऱ्या ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर, संजय वाघुले यांनी तत्काळ महापालिकेच्या संबंधित विभागांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराने पोकलेनच्या मशीनने हे स्टॉल हटविले. तूर्त सारस्वत बँकेसमोरील स्टॉल हटविला असून, तलावपाळी येथील स्टॉलही उचलणार असल्याचे कंत्राटदाराने मान्य केले.



ठाण्यातील फूटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे राहिले पाहिजेत. फूटपाथवर अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संजय वाघुले यांनी दिला. या टपऱ्यांना विरोध करण्यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रशांत कळंबंटे, अल्पसंख्यक मोर्चाचे शहराध्यक्ष शरीफ शेख, हनीफ खान, संहिता देव, मंगेश ओक आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा