राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, देशाचे माजी कृषी तसेच संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मुळात हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. तो घाईघाईने ठरविण्यात आला नव्हता. हा सत्कार कोणत्याही राजकीय पक्ष संघटनेकडून देण्यात आलेला नव्हता. या पुरस्काराचा निर्णय कोणत्या राजकीय संघटनेने घेतला नव्हता, तर नवी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलेल्या आयोजकांनी घेतला होता. त्यामागे तशी पार्श्वभूमीही होती. मुळात सत्कार कोणाचा करायचा आणि कोणाच्या हस्ते करायचा, हा निर्णय आयोजकांचा असतो, त्यामध्ये अन्य कोणी हस्तक्षेप करूच शकत नाही. शरद पवारांच्या हातून एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला, त्यांना पुरस्कार देण्यात आला. यामध्ये उबाठा सेनेच्या प्रवक्त्याला आकांडतांडव करण्यासारखे काहीही नव्हते. हा विषय मुळातच साहित्य संमेलनाशी संबंधित आहे. हा काही महाविकास आघाडीचा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमावर टीकाटिप्पणी करण्याचा या प्रवक्त्याला कोणताही नैतिक अधिकार नव्हता. हा प्रवक्ता महाराष्ट्राच्या राजकारणात इतका मोठा नक्कीच झाला नाही की, महाराष्ट्राच्या राजकारणात भिष्माचार्य म्हणून अनेक दशके सक्रिय राजकारणात योगदान देणाऱ्या शरद पवारांना काय करावे आणि काय करू नये, याचा सल्ला देण्याइतपत प्रवक्त्याचे नक्कीच कर्तृत्वही नाही. एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्याच्या भूमीतून आले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी काश्मीर आणि पंजाबमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी ज्याप्रकारे काही कामे केली आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार देण्याचा निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्यांनी घेतला आहे. साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे. साहित्य महामंडळ स्वायत्त संस्था असल्याने ते दरवर्षी संमेलन घेण्यासाठी वेगळ्या संस्थेला परवानगी देतात. यंदाचे मराठी साहित्य संमेलन सरहद संस्थेने आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पूर्व सत्कार ही परंपरा आहे. यावेळी महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, असे महाराष्ट्रात म्हटले जाते. ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे अस्तित्वात आली, ते महादजी शिंदे होते. महादजी शिंदे यांच्या नावाने सुरुवातीला एखाद्या लष्करी व्यक्तीला पुरस्कार द्यायचे ठरले होते. मात्र, सदानंद मोरे यांच्यासारख्या अभ्यासकांनी महादजी शिंदे यांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, महादजी शिंदे कवी होते, ते ओव्या आणि अभंग लिहायचे. त्यांनी दिल्लीत महाराष्ट्राची एक चांगली प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी घेतला. हा साहित्य संमेलन आयोजकांचा निर्णय असल्याचे शरद पवारांच्या हातून सत्कार करवून घेण्यात, पुरस्कार घेण्यात एकनाथ शिंदेंनीही आक्षेप घेतला नाही. कारण एकनाथ शिंदे हे एक सृजनशील व्यक्तिमत्त्व असून त्यांना काय करावे, काय करू नये याची प्रगल्भता, समज व उमजही आहे.
शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. पवार यांचे आपल्यासोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते मला भविष्यकाळात कधीही गुगली टाकणार नाहीत, असे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. प्रवक्त्याचा गेल्या काही महिन्यांतील कारभार हा ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ अशा स्वरूपातला आहे. या कार्यक्रमावर आक्षेप घेताना त्यांनी गेल्या काही काळात राज्यात राजकारण विचित्र सुरू आहे. राज्यात कोण कोणाला टोप्या घालत आहे? हे समजून घ्यावे लागेल. राज्याचे सरकार ज्यांनी पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला नको होते, असा सूर आळविला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कलगीतुरा सुरू झालेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रवक्त्यावर टीकेचे आसूड ओढताना प्रवक्त्याला त्याची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळातच राजकीय समंजसपणा, प्रगल्भपणा नसल्यावर वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन जगासमोर होणे स्वाभाविकच आहे. पवारांनी शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार करणे असा प्रवक्त्याने मुद्दा मांडला असला तरी शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी या मुद्द्याचे शवविच्छेदनच केले आहे. शिवसेना कोणीही फोडली नाही. चिन्ह आमच्याकडे आहे. सगळ्या गोष्टी समोर आल्या. मग कोर्टात असो किंवा मग निवडणूक आयोग असो…, मग पक्ष कुठे फोडला?, आम्ही विरुद्ध लढलो. त्यांच्यासोबत सरकार कोणी स्थापन केले, हे प्रवक्त्यानी बोलले पाहिजे, असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते व राज्याचे मुख्यमंत्री व उबाठा शिवसेनेमध्ये भेटीगाठी वाढीस लागल्या आहेत. उबाठाची नेतेमंडळी फडणवीसांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. पण या घडामोडींना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधीही आक्षेप घेण्यात आला नाही. कारण त्यांना सामाजिक, राजकीय उमज व समज आहे. साहित्य संमेलनाच्या सत्कार समारंभावर भाष्य करून प्रवक्त्याने आपल्यातील वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. साहित्य संमेलनासंबंधित कार्यक्रमाला राजकीय रंग देणे चुकीचे आहे. राजकीय मतभेद, वैमनस्य, वितुष्ठ, वाद यावर टीका करण्यासाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत. राजकीय चर्चा करण्यासाठी, आरोप करण्यासाठी या कार्यक्रमाचा आधार घेणे चुकीचे आहे. या सत्कार समारंभावर उबाठा शिवसेनेकडून झालेल्या टीकेमुळे त्यांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे. दररोज उठायचे, आरोप करायचे आणि दिवसाची सुरुवात करायची, ही अलीकडच्या काळात प्रवक्त्याची कार्यप्रणाली बनली आहे. शरद पवारांनी कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे, कोणाचा सत्कार करायचा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील वटवृक्ष आहेत. गेली अनेक दशके त्यांनी महाराष्ट्राच्या तसेच दिल्लीच्या सक्रिय राजकारणात घालवली आहेत. विशिष्ठ जनाधार आजही त्यांच्या पाठीशी आहे. जनतेतून एकदाही निवडून न आलेल्या प्रवक्त्याची त्यांना सल्ले देण्याइतपत उंची अजून वाढलेली नाही. शरद पवारांना दिलेला सल्ला ही संतापजनक बाब असून राष्ट्रवादी व शिवसेनेकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंचा सत्कार दिल्लीत झाला असला तरी त्याचे पडसाद मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत.