खेड : कोकणातील एक मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या लोटे एमआयडीसीतील (Lote MIDC) असंख्य कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुरक्षा आणि किमान सुविधा 'राम भरोसे' असल्याचे भीषण वास्तव सातत्याने समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी येथील एका कंपनीच्या ठेकेदारकडून कंत्राटी कामगारांना गुलामासारखी वागणूक मिळत असल्याची घटना समोर आली. त्याआधी एका कंपनीतील दोन कामगार कंपनी आवारातच शेकोटी केल्यामुळे भाजल्याची घटना समोर आली. गेल्या दोन तीन वर्षांत अनेक कंपन्यांमधून स्फोट होणे, आग लागणे, वायू गळती होणे याशिवाय लहान-मोठे अपघात होणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत. मात्र असं असूनही कामगारांची सुरक्षा महत्त्वाची मानून ठोस उपाययोजना करण्यास कंपन्या, त्यांचे मालक, त्यांचे व्यवस्थापन टाळाटाळ करताना दिसतात. ज्यांच्या जीवावर कारखाने चालू आहेतख त्यांच्या जीवाची किंमत कंपनी मालकांच्या आणि व्यवस्थापनाच्या लेखी शून्य असल्याचे भीषण वास्तव ठळकपणे समोर येऊनही त्याकडे कोणी गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.
जामसूत गावच्या संतोष साळवींचा सन्मान भाषेच्या संस्कृतीसाठी अमेरिकेत सुरु केल्या सात मराठी ...
शासकीय यंत्रणांबद्दल बोलायलाच नको. त्यांच्या दर महिन्याच्या भेटींचा 'अर्थ' खूप मोठा आहे. एमआयडीसीचे अधिकारी, प्रदूषणचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी नेमकं काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. काही ठराविक कंपन्या सुरक्षाविषयक नियम, उपाययोजना करताना दिसतात किंवा एखादी दुर्घटना घडली तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. पण अशा कंपन्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. बहुसंख्य कारखाने, मालक बेदरकार, बेजबाबदार आहेत. त्यांचे व्यवस्थापनही त्याच प्रतीचे आहे.
स्फोट, आग, वायुगळती अशा घटना घडू नयेत म्हणून आणि घडल्या तरी त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सक्षम यंत्रणा याठिकाणी नाही. त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. कामगारांना गुलामासारखे, वेठबिगारासारखे राबवायचे आणि त्यावर बक्कळ पैसा मिळवून ऐशारामात राहायचे, वेगवेगळ्या राजकीय पुढऱ्यांना हाताशी धरून दडपादडपी करायची, अशी पद्धत येथे बोकाळली आहे.
अनेक कारखाने हे भंगाराचे गोडाऊन वाटावे इतक्या वाईट परिस्थितीत चालू आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्यांची मानसिक, शारीरिक पिळवणूक होत असते. एवढं करून पुरेसा पगार हातात पडेल याची खात्री नाही.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रश्न फार गंभीर होत चालले आहेत. सुदैवाने उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत, अभ्यासू आहेत, प्रामाणिक आहेत, कार्यक्षम आहेत, सामान्य माणसांविषयी विशेष आस्था बाळगणारे आहेत, कामगारांच्या जीवाचे मोल जाणणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडुन फार मोठ्या अपेक्षा आहेत. येथील कारखान्याची सर्व प्रकारची ऑडिट पारदर्शकपणे झाली पाहिजेत यासाठी ते स्वतः जातीने लक्ष घालतील, अशी अपेक्षा आहे.