मुंबई, दिल्लीला जातात रोज तीन लाख गुलाब, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
नाशिक : ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) च्या पार्श्वभूमीवर गुलाबाला देशभरातून मोठी मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ७ रुपयांना विकला जाणारा गुलाब १० रुपयांना विकला जात आहे. यात ग्राहक टॉप सीक्रेट गुलाबाला अधिक पसंती देत आहे. द्राक्ष, कांदा पाठोपाठ नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाला ओळखले जाते. १४ फेब्रुवारी होणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ मुळे गुलाब भाव खाऊन जात आहे. दोन महिन्यांपूर्वी १५० रुपये डझनने विकला जाणारा गुलाब आता चक्क २०० ते २२० रुपये डझनने विकला जात आहे. त्यामुळे बाराही महिने विविध समारंभासाठी फुलांची मागणी असल्याने शेतकरी फुल शेतीकडे वळाला आहे.
शहरातील मखमलाबाद सोबत जिल्ह्यातील दिंडोरी, खेडगाव, पालखेड, मोहाडी, जानोरी या भागात ८० हेक्टर क्षेत्रावर फुलशेती केली आहे. १५ हेक्टरवर पॉलिहाऊसमध्ये विविध प्रकारच्या गुलाबाचे उत्पादन होते. यात टॉप सीक्रेट, बोंडेक्स, सिलीयर, सफेद गुलाब, पिंक गुलाब अविलॉन्च या गुलाबांना देशभरातून अधिक मागणी आहे. नाशिकमधून दररोज दिल्लीला एक लाख तर मुंबईला दोन लाख गुलाब निर्यात केली जाते. तसेच हाच गुलाब पश्चिम आशियासह सिंगापूर, युरोपात व्यापाऱ्यांमार्फत पाठवला जातो.
मिशन रेबीज: मुंबईत सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
नाशिक जिल्ह्यातील वातावरण गुलाब शेतीला अनुकूल आहे. त्यामुळं बहुतांशी शेतकरी आता फुलशेतीकडं वळाला आहे. इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीत जोखीम कमी असून बाजारपेठही उपलब्ध होते. येथील गुलाब व्यापाऱ्यांमार्फत मुंबई, दिल्लीला जातात. तसेच स्थानिक बाजारपेठेत इव्हेंट मॅनेजमेंट आणि फुल विक्रेत्यांमार्फत शेतकरी फुलांची विक्री करतात.
दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे गुलाबाला अधिक मागणी असते. जानेवारी आधी साधा गुलाब १५ ते २० रुपये डझन विकला जातो. तोच आता ३५ ते ४० रुपये डझन विकला जात आहे.
पॉलिहाऊसमध्ये होणाऱ्या गुलाबाला मागणी
पॉलिहाऊसमध्ये होणाऱ्या गुलाबांना अधिक मागणी आहे. सध्या शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पॉलिहाऊसमध्ये फुलांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एकरी ५५ ते ६० लाख रुपये खर्च येतो. तसेच उघड्यावरील गुलाब शेतीसाठी एकरी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पॉलिहाऊस उभारण्यासाठी मोफत मार्गदर्शन दिले जाते. शिवाय एकात्मिक विकास फलोत्पादन अभियानांतर्गत ५० टक्के अनुदान दिले जात आहे.