मुंबई : प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक (Classical singer) पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रभाकर कारेकर हे गेल्या दोन वर्षांपासून आजरी होती अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Prabhakar Karekar)
Ganeshotsav 2025 : गणरायाच्या मूर्तींबाबत पालिकेचा मोठा निर्णय!
उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायक, शास्त्रीय संगीताबरोबरच फ्युजन संगीतातही वैशिष्ठ्यपूर्ण काम, उत्कृष्ट शिक्षक अशी बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित प्रभाकर कारेकर गेली दोन वर्ष यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. अखेर बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या शिवाजी पार्क येथील घरी ठेवण्यात आले असून दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे तीन मुलं आणि सुना-नातवंडं असा परिवार आहे.
पंडित प्रभाकर कारेकर यांची कारकिर्द
१९४४ मध्ये गोव्यात म्हापसा येथील दैवज्ञ कुटुंबात पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय संगिताचे धडे घेतले. पंडित कारेकर यांनी अनेक गाजलेली मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल…, करिता विचार सापडले वर्म…, वक्रतुंड महाकाय… यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना एक आघाडीचे कलाकार आणि एक चांगले शिक्षक म्हणून ओळखले जात होते. ऑल इंडिया रेडीओ आणि दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते आणि या माध्यमांवरील ते लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर एक फ्युजन अल्बम केला होता.
तानसेन सन्मान (२०१४), संगीत नाटक अकादमी (२०१६), लता मंगेशकर पुरस्कार, गोमान्त विभूषण पुरस्कार (२०२१) आदी प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना नावाजण्यात आले होते. संगीत क्षेत्राशी संबंधित कार्यशाळा घेणे, देशोदेशी होणाऱ्या संगीत विषयक परिषद-कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याबरोबरच अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताचे शिक्षण दिले. शास्त्रीय संगीत हाच ध्यास आणि श्वास घेऊन जगलेल्या अग्रणी कलाकारांमध्ये पंडित प्रभाकर कारेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. (Prabhakar Karekar)