बर्लिन : जर्मनीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील म्युनिक येथे गुरुवारी ( १३ फेब्रुवारी ) एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने गर्दीत धडक दिली. या कारने गर्दीत घुसून २० लोकांना चिरडले आहे. यामध्ये लहान मुलांसह अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कार चालकाला अटक केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना ट्रेड युनियन वर्डी या कामगार संघटनेने आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान घडली. या निदर्शनाच्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या कारने गर्दीत घुसून अनेकांना धडक दिली. या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी चालकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत आणि चालकाला घटनास्थळीच पकडण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ड्रायव्हर आता इतर कोणासाठीही धोका नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाने जाणीपूर्वक गर्दीत गाडी घातली.
पाच लाखाहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची नोंद
या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने नाकेबंदी केली. तसेच जखमींना वैद्यकीय मदत देखील पुरवण्यात आली आहे. म्युनिख फायर डिपार्टमेंटचे प्रवक्ते गेरहार्ड पेश्के यांनी सांगितले की, आरोपी गर्दीत घुसून लोकांना चिरडत असताना अनेक लोक जवळच्या इमारतींमध्ये पळून गेले होते.सध्या हा हल्ला होता की, अपघात याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले.बिल्ड वृत्तपत्रानुसार, अपघातात १५ जण जखमी झाले आहेत, तर फोकस मासिकाने ही संख्या २० असल्याचे वृत्त दिले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. उद्या(१४ फेब्रुवारी) म्युनिकमध्ये जागतिक दर्जाची सुरक्षा परिषद होणार आहे. त्याआधी, या मोठ्या अपघातामुळे सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होतात.
६१व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान म्युनिखच्या बेयरिशर हॉफ हॉटेलमध्ये होणार आहे. यासाठी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्युनिखमध्ये दाखल झाले आहेत. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या परिषदेसाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी हा अपघात घडला आहे.