सोलापूर : मंदिर समितीने दर्शनबारीचे योग्य आणि सुलभ नियोजन केल्यामुळे यंदाच्या माघी यात्रेसाठी आलेल्या अधिकाधिक भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. यात्रा काळात तब्बल पाच लाखाहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे.
नुकत्याच झालेल्या माघी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने पंढरीत आले होते. त्यामुळे पंढरीनगरीत भक्तीचा महापूर आला होता. यावर्षी माघी यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने दर्शनबारीचे सुलभ आणि योग्य नियोजन केले होते.
गोपाळपूर रोडवरील मोकळ्या जागेत दर्शनबारीसाठी नऊ पत्राशेड उभारले होते. दर्शनरांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा केल्या होत्या.