मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई पालिकेच्यावतीने बोरिवली दहिसर परिसरातील भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून या इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले तरी या ठिकाणी पालिकेच्यावतीने आरोग्य सेवा दिली जाणार नसून खासगी सहभाग तत्वावर खासगी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा विचार सुरु आहे. भगवती रुग्णालयांसह एम पूर्व विभागातील ३०० खाटांची हस्तांतरीत होणारे रुग्णालय व विक्रोळीतील ३० खाटांच्या रुग्णालयांचेही खासगीकरण केले जाणार आहे. याशिवाय बोरिवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नॉस्टिक सेंटर व जाखादेवी येथील आरोग्य सुविधा केंद्राचेही खासगीकरण केले जाणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरण राबवणार असल्याची घोषणा केली आहे. आर उत्तर विभागातील ४९० खाटांचे भगवती रुग्णालय, बोरिवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नॉस्टिक सेंटर, दादरमधील सुविधा केंद्र, जाखादेवी आरोग्य विक्रोळी पार्क साईट वरील ३० खाटांचे रुग्णालय व एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत झालेले एम पूर्व विभागातील ३०० खाटांचे रुग्णालयांच्या वास्तु ३० वर्षांच्या करारावर आरोग्य सेवांकरता खासगी संस्थांना दिल्या जाणार आहे.
आरोग्य सेवांसाठी पीपीपी धोरण
विशेष म्हणजे भगवती रुग्णालयाचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु असून या भगवती रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुमारे १ हजार कोटींच्या आसपास खर्च करण्यात येत आहे. या रुग्णालयाचे काम इमारतीचे ९० टक्के पूर्ण झाले असून हे काम येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेने कोट्यावधी रूपये खर्च करून हे रुग्णालय खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या धोरणानुसार रुग्णांना करावा लागणारा खर्च आणि महापालिकेचा आवर्ती खर्च कमी होईल.