केज : संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला केज कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सीआयडीने त्याच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु कोर्टाने तीन दिवस कोठडी सुनावली. संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले हा न्यायालयीन कोठडीत होता.
यापूर्वीही एसआयटीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. त्याच्या दोन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी आणि मोबाईल लॉक काढण्यासाठी त्याची कोठडी घेण्यात आलेली होती. त्यानंतर तो पुन्हा न्यायालयीन कोठडीत गेला होता. आता पुन्हा १४ फेुब्रुवारीपर्यंत सुदर्शन सीआयडीच्या कोठडीत असेल.
रुपाली चाकणकरांबाबत आक्षेपार्ह Facebook Post करणाऱ्या दोघांना अटक
याअगोदर सुदर्शन घुलेची चौकशी ही खून प्रकरणात झाली होती. परंतु आता खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेची चौकशी होणार आहे. त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि कॉल डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी त्याचं व्हाईस सॅम्पल घेण्यात येणार आहे. सुदर्शन घुलेवर खंडणी, अपहरण, खून हे तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून तो फरार झाला होता. तसाच तो वाशीला गेला आणि तिथे गाडी सोडून साथीदारांसह पळून गेला. तिथून छत्रपती संभाजी नगर, गुजरात, पुणे असा काही आरोपींनी प्रवास केला.
यादरम्यान ते कुणाकुणाशी बोलले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. ते सगळे लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुदर्शन घुलेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीला हवे आहे. बुधवारी केजच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली.