मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.
महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या पेजवरुन जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास करुन पोलिसांनी आकाश डाळवे (३०, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि अविनाश पुकळे (३०, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली. आकाशला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर अविनाशला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली. दोघांना पोलिसांनी गिरगाव येथील १८ व्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्यासमोर हजर केले. याआधी याच प्रकरणात नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.