Saturday, March 15, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखभाजपाला विजयासाठी संघटना महत्त्वाची...

भाजपाला विजयासाठी संघटना महत्त्वाची…

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या दशकभराच्या सत्तेला सुरुंग लावत आम आदमी पक्षाला सत्तेवरून खाली खेचत भाजपा दिल्ली विधानसभेच्या तख्तावर तब्बल अडीच दशकांनी विराजमान झाला. अलीकडच्या काळात निवडणुका कोणत्याही असो. विधानसभेच्या असो अथवा लोकसभेच्या असो. मोदी है, तो मुमकीन है, हा नारा देशाच्या कानाकोपऱ्यांत विराजमान झाला असल्याने विरोधकांनी निवडणूक काळात प्रचारादरम्यान आरोपांचा गोंधळ घालायचा, मतदारांनी मतदान करायचे, मतदान प्रक्रिया संपल्यावर एक्झिट पोलवाल्यांनी सत्तेवर भाजपा व मित्रपक्ष कसा विराजमान होणार, हे सांगायचे आणि मतमोजणीच्या दिवशी भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षांनी बहुमत मिळवायचे, असाच प्रकार सुरू आहे. अगदी काल, परवा झालेल्या दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही याला अपवाद ठरल्या नाहीत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी तब्बल ४८ जागांवर विजय मिळवत भाजपाची दिल्लीची सत्ता मिळविली. सत्ता मिळविल्यावर जमिनीवर पाय ठेऊन विजयाचा विनम्रपणे स्वीकार कसा करायचा, हे आपल्या लोकशाही देशातील सर्वच राजकीय, राष्ट्रीय पक्षांनी शिकण्यासारखे आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘न भूतो, न भविष्यते’ असे यश मिळवूनही कोठेही विजयाचा जल्लोष साजरा केला नाही. कोठेही गदारोळ नाही, कोठेही विरोधकांवर राजकीय चिखलफेक नाही.
सत्ता मिळताच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने कामाला सुरुवात केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळावर दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळवत स्वबळावर भाजपाने सत्ता संपादन केली.

दिल्लीचा विजय मिळविताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे यश कार्यकर्त्यांना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि पक्षसंघटनेला समर्पित केले. त्यावेळेला कोणताही राजकीय नेता, पदाधिकारी यापेक्षा संघटना महत्त्वाची हा लाखमोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. यश येते व जाते, पण संघटना भक्कम असल्यावर, संघटनेच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी जनाधार उभा केल्यावर संघटनेला सत्तेपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, या स्वरूपात मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. भाजपा पक्षाचा स्थापनेपासूनच इतिहास पाहिल्यावर या पक्षामध्ये नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नव्हे, तर ग्रासरुटच्या कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जाते. संघटनेला महत्त्व दिले जात आहे. भाजपा पक्षसंघटनेवर आरएसएसचा प्रभाव असल्याने कार्यकर्त्यांच्या मनावर बालपणापासूनच संघटना सर्वोच्च स्थानी हेच बिंबविले जात असते. पूर्वीच्या अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींचा भाजपा ओळखला जात असायचा, आता तोच भाजपा नरेंद्र मोदी-अमित शहा यांची ओळख सांगत आहे. आज वाजपेयी व अडवाणींचा परिवार भाजपात कोठेच दिसत नाही? उद्या मोदींच्या बाबतीतही हेच चित्र पाहावयास मिळणार आहे. परवा हाच कित्ता अन्य कोणी भाजपामध्ये गिरवताना पाहावयास मिळणार आहे. व्यक्ती येतील आणि जातील, पण पक्षसंघटना कायम राहणार आहे. त्यामुळे जी गोष्ट स्थायी असते, तिचेच महत्त्व वाढविण्यासाठी जीवन समर्पित करावे अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची कार्यप्रणाली आहे.

काँग्रेस आणि भाजपा या दोन देशांमध्ये मुळात हाच तर आज खरा फरक आहे. काँग्रेसने संघटनेऐवजी घराणेशाहीला महत्त्व दिल्याने आणि सत्तेची धुरा घराणेशाहीपुरतीच सीमित राहिल्याने आज देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष देशोधडीला लागला आहे. नेहरू-गांधी घराणे आज भारतीयांच्या लक्षात आहे, पण या घराण्यांनी ज्या काँग्रेसच्या बळावर देशाची सत्ता अमर्यादपणे अनेक वर्षे उपभोगली, तो काँग्रेस पक्ष आज कोठे आहे?, तर आज काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. २०१४ पासून सुरू झालेल्या राजकीय पिछेहाटीनंतर काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. गोव्यात पर्रिकर, मध्य प्रदेशामध्ये शिवराजसिंह चौहान, उत्तर प्रदेशामध्ये कल्याणसिंह यासारखी अनेक नावे देशाच्या कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या राज्यांमध्ये भाजपाचे नेतृत्व करत होती. आज भाजपा त्या-त्या राज्यात सत्तेवर असला तरी त्या-त्या राज्याच्या सत्तेची धुरा नवनवीन नावाकडे पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचा विचार केल्यास ठरावीक नावांपुरतीच काँग्रेसची पक्षसंघटना आजही सीमित असल्याचे दिसून येते. त्याच घराण्यांनी पक्षसंघटना सांभाळायची आणि सत्ता मिळाल्यावर त्याच घराण्यांनी सत्तेत मंत्रीपदे मिळवायची, असाच कारभार सुरू होता. त्यामुळे घराणी राजकारणात, पक्षसंघटनेत कायम राहिली, पण काँग्रेसची मात्र सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आली.

भाजपा सत्तेवर येताच अनेक राज्यांमध्ये भाजपाचे कमळ फुलले. पण राजकीय घराणी मात्र भाजपामध्ये बदलत गेली असली तरी सत्ता मात्र वाढत गेली. आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपामध्ये सर्वेसर्वा असले तरी उद्याच्या काळात फडणवीस घराण्यांच्या जागी दुसरे कोणीतरी भाजपाचे महाराष्ट्रात नेतृत्व करताना पाहावयास मिळेल. भाजपाची आज राजकीय भरभराट २०१४ पासून खऱ्या अर्थांने सुरू झाली असली तरी त्याचा पाया खऱ्या अर्थांने वाजपेयी-अडवाणींच्या काळात रचला गेला आहे. अर्थांत त्यांना कल्याणसिंह, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन यांच्यासारख्या अनेक रथी-महारथींनी साथ दिली आहे. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास आज फडणवीस भाजपाच्या बोटीचे मुख्य खलाशी असून मुंडे, तावडे, बावनकुळे, पाटील, मुनगंटीवार अशी अनेक नावे भाजपाच्या बोटीचे राजकीय भवसागरात संतुलन राखण्याचे काम करत आहेत. अर्थांत काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यासारख्यांनी भाजपाची यशस्वी धुरा सांभाळली. भाजपाने जर काँग्रेससारखा कुटुंब कल्याण कार्यक्रम जोपासला असता तर भाजपा व काँग्रेसमध्ये आज कोणताही विरोधाभास दिसला नसता. भाजपाने नेहमीच पक्षसंघटना व तळागाळातल्या कार्यकर्त्याला केंद्रभूत मानले. काँग्रेसने मात्र सत्ताकारण कुटुंबांपुरतेच सीमित ठेवले. त्यामुळे यातील अनेक कुटुंबे आज काँग्रेसच्या सत्ताकारणाला राजकीय घरघर लागताच अन्य पक्षांमध्ये निष्ठेचे गोडवे गाऊ लागले आहेत. संघटना महत्त्वाची हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विजयानंतर देताना यशाचा विनम्रपणे स्वीकार करा, यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, जमिनीवर पाय ठेवा, असा सल्ला देताना आपल्या लोकाभिमुख कार्यातून पक्ष संघटनेचा जनाधार वाढवण्याचे निर्देश दिले आहेत आणि हेच भाजपाच्या यशाचे कालचे, आजचे आणि उद्याचे गमक राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -