संगमनेर : तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी आधिका-यां समवेत आपण लवकरच बैठक घेणार असून, पाणी प्रश्न हाच आपला प्राधान्यक्रम आहे. नगरपालिका हद्दीतील प्रश्नांबाबतही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन, निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन देतानाच अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विचारात घेवून महायुतीच्या पदाधिका-यांनी तालुक्यात आणि शहरात संघटना बांधणीचे काम सुरु करण्याच्या सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.
तालुक्यातील मांचीहिल येथे पालकमंत्री विखे पाटील आणि तालुक्यातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये तालुक्यातील महत्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. भविष्यात तालुक्यात राबविण्यात येणा-या नव्या योजनांची आणि कामांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे प्रमुख शाळीग्राम होडगर, जेष्ठनेते वसंतराव गुंजाळ, भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, राट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, विठ्ठल घोरपडे, दिनेश फटांगरे, जावेदभाई जहागिरदार, डॉ. अशोक इथापे, श्रीराज डेरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणूकीत तालुक्यातील मतदारांनी मोठ्या विश्वासाने परिवर्तन घडविले आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला मोठे यश आले. त्यामुळे निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करुन, या तालुक्यात नवे विकासाचे पर्व सुरु करण्यासाठी सामुहिकपणे आपल्याला काम करायचे आहे असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
या तालुक्यात प्राधान्याने पाणी प्रश्न गंभिर आहे. निळवंडे कालव्यांच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना दिलासा मिळाला असला तरी, लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या गावांना पाणी कसे देता येईल याबाबतचा अभ्यास विभागाने सुरु केला असून, भोजापूर चारीचे पाणीही शेवटच्या गावाला मिळेल या दृष्टीने काम करण्याच्या सुचना जलसंपदा विभागाच्या आधिका-यांना देण्यात आल्या आहेत. तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या समस्या सोडवून याबाबतचा एक अंतीम पर्याय शोधून त्यावर काम करावे लागणार असून, निळवंडे धरणातून या योजनेलाही पाण्याची उपलब्धता करण्या बाबतही निर्णय करण्याचे सुतोवाच मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत केले.
साकुर आणि पठार भागातील गावांसाठी मुळा नदीतून पाणी देण्याबाबत उपसा सिंचन योजनेचा प्रयोग करावा लागणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून काम चालू झाले असून, लवकरच याला अतिम स्वरुप कसे येईल हा माझा व्यक्तिगत प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही ना.विखे पाटील यांनी दिली.
शहरातील प्रश्नांबाबत माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जहागिरदार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत मंत्री विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या आधिका-यां समवेत बैठक घेवून या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मागील युती सरकारच्या काळात तालुक्यासाठी आणि शहरासाठी मंजुर झालेला निधी तसेच निधी मंजुर होवूनही कामाला सुरुवात न झाल्याने याचा आढावा आता घ्यावा लागेल. यासाठी पुढील आवठड्यात तालुक्यात सर्व विभागांच्या आधिका-यां समवेत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व पदाधिका-यांनी सद्य परिस्थितीत असलेल्या गट आणि गणनिहाय दौरे करुन, याबाबत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांशी संवाद साधावा. शहरातील प्रभागांमध्येही महायुतीच्या पदाधिका-यांनी आत्तापासूनच संघटनात्मक कामावर भर देवून लक्ष केंद्रीत करावे अशा सुचनाही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या आहेत.मांची येथील कानिफनाथ देवस्थानला क वर्ग देवस्थानाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मांचीहिल परिवाराच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील अनेक तरुण मला यापुर्वीही भेटले आहेत. औद्योगिक वसाहतीची त्यांची मागणी आहे. तळेगाव किंवा पठार भागात शासकीय जागा उपलब्ध होईल तेथे औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव आपण तयार करुन तो मार्गी लावण्यासाठी माझी केव्हाही तयारी असेल. पाणी प्रश्ना बरोबरच रोजगाराचाही प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले आहे.