आज मनोरंजनाची माध्यमं आणि साधनं प्रचंड प्रमाणात वाढली आहेत आणि लोक वाहिन्या, ओटीटी, youtube, फेसबुक, ट्विटर अशा विविध माध्यमांद्वारे तासंनतास कंटेंट पाहत असतात. निरीक्षणातून असे नोंदवले गेले की, भारतात दिवसाचे सहा – सहा तास घरबसल्या कंटेंट पाहणारी माणसे आहेत. आपल्या देशात साधारण ६० च्या दशकात दूरचित्रवाणी संच आले. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ साली सुरू झाले आणि आपल्या घरोघरी बसून मनोरंजन उपलब्ध होऊ लागले.जवळजवळ १९९१ पर्यंत दूरदर्शन आणि आकाशवाणीची मक्तेदारी होती त्यानंतर खासगी वाहिन्या आल्या आणि गेल्या दशकापासून तर मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती आणि मनोरंजनाचा खजिना सामान्य नागरिकांच्या अक्षरशः हातात आला. त्याचा दर्जा आणि सत्यता याबाबत मात्र साशंकता असू शकते. सुप्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ राज कांबळे यांनी एकदा सांगितले होते की, आज प्रत्येक माणूस हा एक चैनल झालेला आहे. आपल्याला वाटते ते तो डाऊनलोड करू शकतो आणि ते हजारो जणांपर्यंत पोहोचते; परंतु १९९०च्या आसपास ही परिस्थिती नव्हती.
शिबानी जोशी
मनोरंजन क्षेत्रातले काम चित्रपट, नाटक, दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्र इतक्याच माध्यमांपर्यंत सीमित होते, घरातला मुलगा कॉलेजला गेला की, त्याने डॉक्टर, इंजिनियर, लॉयर व्हायचे हेच घरच्यांचं स्वप्नं असे तसंच स्वप्नं बहुतेक तोलिया यांच्याही घरी होतं. त्यामुळे मौतिक तोलिया यांनी सुरुवातीला इंजिनियरिंगला अॅडमिशन घेतली; परंतु त्यात मन रमेना. दरम्यान त्याच काळात त्यांना निंबस या प्रसिद्ध कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी दूरदर्शनसाठीच मालिका बनवल्या जात. स्पोर्ट्स प्रक्षेपणाचे हक्क घेऊन ते दूरदर्शनला प्रसारित केले जात असे. तिथे सेटवरचा अनुभव मिळाल्यावर हे क्षेत्र मौतिक यांना आवडले आणि त्याने त्याच रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स गाठले. मीडियाशी संबंधित शिक्षण घेऊन ते परतले. इथे येऊन त्यांनी एका स्पोर्ट्स चॅनलसाठी जवळजवळ बारा वर्षे काम केले. तोपर्यंत खासगी वाहिन्यांचं जाळे पसरू लागले होते. त्यामुळे खूप काम वाढले होते. मनोरंजन क्षेत्र हे बुममध्ये होतं. त्याचाच फायदा बहुतेक तोलिया यांनी मिळवला आणि बोधी ट्री मल्टीमीडिया ही कंपनी स्थापन केली. तोलिया यांचा प्रसारमाध्यमांचा खूप अभ्यास आहे. ते म्हणतात की, १९८० ते ९० च्या काळात केवळ दूरदर्शन वाहिनी होती आणि ती सॅटॅलाइटद्वारा प्रक्षेपित होत असल्यामुळे जास्त करून शहरी भागातच पाहिली जायची. त्यानंतर दूरदर्शनची डी डी मेट्रो ही दुसरी वाहिनी आली, जी केवळ मेट्रो शहरांमध्ये दिसत असे. दूरदर्शनच्या एकाच वाहिनीवर बातम्या, मालिका, मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जात असतं परंतु त्या काळात त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. जुनून, हम लोग, रामायण, महाभारत, सुपरहिट मुकाबला अशा अनेक मालिकांमुळे अनेक कलाकारही पुढे आले होते आणि ही इंडस्ट्री हळूहळू वाढत होती. १९९१ नंतर झी, स्टार यांसारख्या खासगी वाहिन्या आल्या आणि एक ग्रीन फिल्ड तयार झाले. ग्रीन फील्ड म्हणजे काय तर त्यामुळे एक पूर्ण इकॉसिस्टीम तयार होतं असते, त्यात आपण जी बीजं रोऊ तशी हिरवाई येणार असते. ते नशीबवान ठरले कारण त्याच काळाचा फायदा त्यांना मिळाला. सुरुवातीला सॅटलाइट चॅनल सुरू झाली, त्यानंतर प्रादेशिक भाषेतील विविध वाहिन्या येऊ लागल्या आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. सॅटलाइटवरून उपग्रह आणि आता गेल्या पाच-सात वर्षांत तर इंटरनॅटवरूनही चॅनेल्स प्रक्षेपित होत असतात. या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रचंड वाढीचा परिणाम आपल्याला दिसून येतो.
तोलिया यांनी स्पोर्ट्स चॅनल, दूरदर्शन आणि नंतर खासगी वाहिन्यांवर खूप काम केले. काही मालिका केल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, तंत्रज्ञान खूप वेगाने विकसित होत आहे; परंतु तंत्रज्ञान हे माध्यम आहे. कंटेंट हा लोकांना आवडणारा आणि चांगलाच पाहिजे. कंटेंट, स्टोरी चांगली असेल तर लोक ते पाहणार आहेत मग माध्यम कुठलंही असो आणि त्यातूनच त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढायचे ठरवले आणि बोधी ट्री मल्टीमीडिया लिमिटेड या कंपनीची २०१३ ला स्थापना झाली. सुकेश मोटवानी यांच्यासह त्यानी ही कंपनी सुरू केली. बोधी ट्री हे नाव कसे सुचले? असे विचारलं असता मौतिक म्हणाले की, बोधी वृक्षाप्रमाणे आपण क्रियेटर्स, सृजनशील कलावंत, लेखक यांच्यासाठी एका वृक्षासारखे काम करायचे, अनेक चांगल्या लोकांना संधी द्यायची आणि गुणवत्ता पूर्ण चांगला कंटेंट लोकांना दाखवायचा त्यातूनच बोधी ट्री हे नाव पटकन डोक्यात आले. त्यांची शहरात के कझिन्स ही पहिली स्टार प्लसवर मालिका केली. केवळ सांस बहू मालिकेपेक्षा वेगळा कंटेंट देणारी अशी एक त्यांची इमेज झाली. यांना काम द्यायला हरकत नाही अशी एक मार्केटमध्ये इमेज तयार झाल्यानंतर झीवर फियर फाइल्स अशी एक हॉरर मालिका त्यांनी केली आणि ती देखील गाजली. अशा रीतीने बोधी ट्रीचा मालिका आणि कंटेंट क्षेत्रामध्ये पसारा वाढू लागला. त्यानंतर तरुणांना आवडणाऱ्या चैनल व्ही, एम टीव्हीसाठी देखील काम केले आणि त्यानंतर जवळजवळ सगळ्याच वाहिन्यांवर त्यांच्या मालिका सुरू झाल्या. आधी ब्रॉडकास्टिंग होते, त्यानंतर सहा- सात वर्षांपासून स्ट्रिमिंग झालं. यू ट्यूब, पॉडकास्ट, ओटीपी, नेट फिक्स, अमेझॉन यांसारखी माध्यम आली. त्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने काम सुरू केले. त्याच काळात कोरोना पांडेमिक आले. त्यातही लोकांच्या घरोघरी जाऊन शूट करून काँगो नावाची मालिका त्यांनी सुरू ठेवली आणि तो एक मालिका क्षेत्रातला माईल स्टोन ठरला. कारण त्या काळात मालिका प्रोड्यूस करणे हे खूप आव्हानात्मक काम होते. अशा रीतीने सातत्याने काळाबरोबर तंत्रज्ञानाशी हात मिळवून क्रिएटिव्ह कंटेंट देत राहिल्यामुळे बोधी ट्रिच मालिकेचे चित्रपट क्षेत्रात खूप नाव झाले आणि एक दर्जेदार कंपनी म्हणून ती ओळखली जाऊ लागली.
कोरोना काळामध्ये बनवलेल्या मालिकेची दखल फोर्ब्ज मासिकांना देखील घेतली होती. त्यानंतर नेटफ्लिक्सने पहिल्यांदाच दुसऱ्या भाषेतील मालिका आशियाई देशांमध्ये प्रसारित करायचे ठरवले आणि त्यांची क्लास नावाची एक स्पॅनिश मालिका होती, जी अतिशय एलाईट अशी मालिका होती. ती करण्यासाठी बोधी ट्रीला पाचरण केले. तोलिया यांनी अगदी दूरदर्शनसारखी एकच वाहिनी असताना त्यासाठी काम केले तसंच आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काम करत आहेत. त्यामुळे आपल्या देशातल्या प्रसारमाध्यमांचा प्रसार त्यांनी जवळून बघितला आहे. याविषयी विचारले असता, तोलिया म्हणाले की, गेल्या ६०-७० वर्षांत जगभरातच माध्यमातून प्रचंड बदल झाले आहेत. घरोघरी इन्फ्ल्यूंझर किंवा कंटेंट क्रियेटर जन्माला येऊ लागले आहेत पण जे चांगलं असेल तेच बघितले जाते. त्यामुळे तेच प्रसिद्ध होऊन जातात. आमच्यासारख्या निर्मात्यांना, फिल्म मेकर्सना हे एक आव्हानच निर्माण झाले आहे की, लोकांचे अटेन्शन आपल्याकडे वळवणं. त्यामुळे चांगले, खिळवून ठेवणारे विषय लोकांसमोर नेणं हे खूप गरजेचे झाले. थेटरकडे आकर्षित करणारे विषय, कन्टेन्ट देणे गरजेचे ठरत आहे. बाहुबली, कलकी, लापता लेडीज किंवा बाई पण भारी देवा अशासारखे चित्रपट वेगळेपणामुळेच म्हणूनच चालतात. या क्षेत्राचे भविष्य चांगलेच आहे.
नव्या येणाऱ्या मुलांना या क्षेत्रात खूप संधी आहेत. आज वेगवेगळे कोर्स शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. सृजन असेल तर खूप चांगले भविष्य या क्षेत्रात आहे, असे तोलिया यांनी सांगितले. गेल्या नोव्हेंबरपासून त्यांची एक मोठी मालिका सुरू आहे. तसेच अशोक सराफ यांना ‘हम पांच’नंतर पुन्हा एकदा टीव्ही मालिका क्षेत्रात ते घेऊन येत आहेत, त्यांच्या ४०+ मालिका झाल्या आहेत. त्यांची बोधी ट्री मल्टमीडिया लिमिटेड ही कंपनी मुंबई शेअर बाजारात लिस्टेडही झाली आहे. पूर्वीच्या काळी नाटक, सिनेमा कंपन्यांचा जनता जनार्दनाच्या प्रतिसादावर नफा-तोटा ठरत असे. कधी कंपनी डबगाईला जात असे तर कधी बंद पडत असे; परंतु आज मनोरंजन कंपनी शेअर बाजारात लिस्टेडसुद्धा होऊ शकत आहे. हे बोधी ट्रीवरून लक्षात येईल आणि मनोरंजन क्षेत्र, माध्यम क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेले स्थान लक्षात येऊ शकेल, तर अशी ही लिस्टेड मनोरंजन कंपनी बोधी ट्री मल्टीमीडिया.
joshishibani@yahoo. com