वीजपुरवठा खंडित होण्यास माकड जबाबदार! श्रीलंकेत देशभरात जनजीवन विस्कळीत
कोलंबो : रामायणातलं दृश्य आठवतंय? रावणाची सोन्याची लंका एका माकडानं म्हणजेच हनुमानानं जाळली होती. (Hanuman Leela) आता, आधुनिक काळातही माकडांनी श्रीलंकेत हाहाकार माजवलाय. आश्चर्य वाटेल, पण एका माकडामुळे संपूर्ण श्रीलंका अंधारात गेली!
रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी ११ च्या सुमारास कोलंबोच्या दक्षिणेकडील एका वीज केंद्रात घडलेल्या या विचित्र घटनेने देशभरात जनजीवन विस्कळीत झाले. श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्र्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला असून, या वीजकेंद्रात घुसलेल्या एका माकडामुळेच वीजपुरवठा खंडित झाल्याचं स्पष्ट केले आहे.
देशभरात अंधार, वैद्यकीय सुविधांवर परिणाम
सुमारे २.२ कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेत अचानक वीज गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्था यावर गंभीर परिणाम झाला. अनेक नागरिकांना जनरेटरची मदत घ्यावी लागली.
प्रशासनाने परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले, तरी वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माकडामुळे ब्लॅकआउट!
श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, “एका माकडाने ग्रीड ट्रान्सफॉर्मरला स्पर्श केला आणि त्यामुळे संपूर्ण वीजप्रणाली ठप्प झाली.” ही बाब ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Aeroindia 2025 : बंगळुरूच्या एअर शो मध्ये रशिया आणि अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमानं
सोशल मीडियावर सरकारची खिल्ली
या घटनेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, सरकार आणि वीज वितरण यंत्रणेवर टीकेची झोड उठवली जात आहे.
एक्स युझर मारिओ नाफल यांनी पोस्ट केले आहे की, “एका माकडाच्या प्रतापाने संपूर्ण श्रीलंकेची वीज प्रणाली बंद पडली!”
डेली मिररच्या मुख्य संपादक जमीला हुसेन यांनी लिहिले आहे की, “वीज केंद्रात माकडांची मारामारी आणि संपूर्ण देश अंधारात? अशी घटना फक्त श्रीलंकेतच घडू शकते.”
वीज प्रणाली सुधारण्याची गरज!
डेली मिररने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अभियंते अनेक वर्षांपासून सरकारला वीज यंत्रणा अपग्रेड करण्याचा सल्ला देत आहेत, मात्र यावर अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
एका वरिष्ठ अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, “आमची वीज प्रणाली इतकी कमकुवत झाली आहे की, एखादा छोटासा अडथळा आला तरी संपूर्ण देश अंधारात जाईल.”
पूर्वीही घडलेत ब्लॅकआउट
ही पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्ये आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेने मोठ्या प्रमाणावर वीज कपातीचा सामना केला होता. आता पुन्हा एकदा माकडामुळे संपूर्ण देशाच्या वीज यंत्रणेची दुर्दशा उघड झाली आहे.
दरम्यान, ही घटना फक्त एक अपघात म्हणायचा की श्रीलंकेच्या वीज यंत्रणेतील मोठ्या त्रुटीचं लक्षण? आता सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.