बंगळुरू : मुंबईत निलगिरी फ्रिगेट, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी १५ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात नौदलात दाखल झाल्या. यामुळे नौदलाचे बळ वाढले. आता कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान येलहांका विमानतळावर एअर शो रंगणार आहे. एरो इंडिया २०२५ या नावाने हा एअर शो होणार आहे. या एअर शो च्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी कंपन्यांच्या भागीदारीला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. मागील काही वर्षांपासून सातत्याने हा प्रयोग सुरू आहे आणि त्याला हळूहळू यश येऊ लागले आहे. या निमित्ताने विमान उद्योगांशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान भारतात येऊ लागले आहे. भारताच्या विमान उद्योगाचा विस्तार होऊ लागला आहे.
यंदाच्या एअर शो मधील १०, ११ आणि १२ फेब्रुवारी हे तीन दिवस व्यावसायिक भागीदारी आवश्यक कार्यक्रमांकरिता असतील. तर १३ आणि १४ फेब्रुवारी या दोन दिवशी नागरिकांसाठी एअर शो चे आयोजन केले जाईल. हे एअर शो सामान्य नागरिकांना बघता येतील. या वर्षीच्या एरो इंडिया २०२५ मध्ये हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातल्या व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन यांचा समावेश असेल. पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षणमंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज परिषद, स्टार्ट-अप कार्यक्रम, चित्तथरारक प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापारमेळा असे एरो इंडिया २०२५ चे स्वरुप असेल.
Manipur News : मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा अखेर राजीनामा
यंदाच्या एअर शो मध्ये तेजस विमानांचा ताफा हवाई कसरती करणार आहे. यातील एका तेजस विमानात हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग असतील. एअर शो मधील हवाई कसरतीसाठी राफेलचं नेतृत्व भारतीय महिला वैमानिक करेल. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीचे एफ ३५ आणि रशियाचे सुखोई अर्थात एसयू ५७ ही दोन लढाऊ विमानं भारताच्या एअर शो मध्ये सहभागी होणार आहे. हे यंदाच्या एअर शो चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. एफ ३५ आणि एसयू ५७ ही जगातील सर्वात प्रगत अशी लढाऊ विमानं आहेत. पाचव्या पिढीची लढाऊ विमानं अशीही यांची ओळख आहे.
एअर शो च्या निमित्ताने होणार परिसंवाद
मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारीबाबत संवाद सुरू करणे आणि वाढवणे यासाठी यंदाच्या एरो इंडिया कार्यक्रमात बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एंगेजमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे यजमानपद भारताकडे असेल. एरो इंडिया २०२५ च्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अशा उच्चपदस्थांसोबत निवडक द्विपक्षीय बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातल्या संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.