६ महिन्यांसाठी कळंबोली सर्कलचा एक्झिट मार्ग राहणार बंद
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम सुरू करत आहे, त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. याचा परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होणार आहे. यामध्ये हलक्या तसेच जड वाहनांच्या वाहतुकीचा देखील समावेश आहे.
पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने यामुळे प्रभावित होतील.या परिसरातील वाहतूक कोंडी टाळणे आणि बांधकाम सुरळीत पार पडावे यासाठी हे निर्बंध २४ तास लागू असतील. या काळात वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत.ज्यानुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा (९.६०० किमी) येथे पळस्पे सर्कलमार्गे राष्ट्रीय महामार्ग-४८ वर वळवली जातील.
या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि तळोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना १.२०० किमी अंतरावरून पनवेल-सायन महामार्गावर सरळ पुढे जावे लागेल आणि पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग-४८ मार्गे पुढे जावे लागेल.