डॉ. विजया वाड
“वेणू, तोंड कुठे काळं केलंयस?” “तिच्या सासूची वटवट चालू झाली. नवा दिवस ! तोंडी परीक्षेचा नवा अध्याय ! मुलगा असेपर्यंत शांत असे घर ! तो घरातून गेला रे गेला की, सासूचे शब्दास्त्र चालू होई. शब्दांचे वर्मी लागणारे घाव ती सटासट सोडीत राही. “मी इथेच तर आहे.” “मग मला कशी दिसत नाहीस गं? आंधळी समजतेस का गं मला? की बावळट?” “ अहो आई, तुमची लाडकी तुळस आहे ना! ती कोमेजलीय जरा.” “तुझी नजर लागली टवळे तिला.” “नाही हो. माझी धाकटी बहीण असल्यागत जपते तिला मी आई.” ती आर्जवने म्हणाली.
“बरं बरं! मानभावीपण पुरे झाला !” सासू परत टकळी चालू करीत म्हणाली. वेणूचा नवरा सगळं जाणून होता. आपल्या आईची टकळी त्याला बंद करता येत नव्हती. कारण तिच्या घरात तो बायकोला घेऊन राहत होता. वेगळं घर घेण्याची ऐपत नव्हती. पगार अगदीच बेतास बात होता. बायको गरीब होती. उलट बोलत नव्हती. सहन करीत होती. “मी तुळशीला पाणी घालते. तिची माती बदलते.” “म्हणूनच ती कोमेजते.” “माझे बाबा उत्कृष्ट माळी आहेत. आमची बाग तुम्ही बघितलीय ना? किती फुलं फुलून आलीत सारी रोपं. त्यांच्याच हाताखाली मी तयार झालेय हो आई.” ती साधेपणानं बोलली. जणू सासूचे सटासट बाण तिला लागलेच नव्हते. “पुरे झाली माहेरच्या कौतुकपुराणाची रेकॉर्ड कान किटले माझे. नि माझ्या तुळशीला तू हात लावू नकोस.’’ “का हो आई?” “तुझी नजर लागते. म्हणूनच कोमेजलीय ती. स्पष्टच बोलते मी. तू घरात आल्यापासून माझी बाग सुकली.” “बरं! नाही लावणार हात तुमच्या रोपांना.” “तुझा कोपरा दिलाय ना तुला?” “हो.” “मग तो सांभाळ! उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस.” “तुम्हाला होत नाही म्हणून करीत होते हो बागेचा तुमच्या सांभाळ पण तुम्ही नको म्हणत असाल, तर नाही करणार मी बागेत तुमच्या झाडांची राखण.” “उलट बोलतेस?” “सॉरी आई माफ करा.” ती नम्रपणे म्हणाली. तो सारं ऐकत होता. आज तो मुद्दाम लवकर आला होता. आपल्या बायकोचे हाल त्याला बघवले नाहीत. तो मध्ये पडला.
“वाटेल ते काय गं, बोलतेस आई?” “मी? काय बोलले बाबा तुझ्या लाडकीला?” “अहो, तुम्ही बोलू नका न प्लीज !” “मला बोलू दे.” “बोल बाबा बोल.” “तू फार टोचून बोलतेस माझ्या बायकोला.” “हा आला! बायकोचा बैल ! आईला उलट बोलतोस?” “आईने डोळ्यांला पदर लावला तसा तो उदास झाला. “आय अॅम सॉरी आई.” “माझ्याशी बोलू नकोस.” “असं का तोडून बोलतेस गं आई?” तो व्यथित झाला. “प्रेमाची नाटकं नकोत. लग्न झालं की आई नकोशी होते. फक्त बायको… बायको नि बायकोच !” “तसं काहीच नाहीये.” तो मृदुपणे म्हणाला.
“तिला घेऊन चालू लाग… दुसरं घर घे.”“घेतलं असतं पण परवडत नाही. तुला ठाऊक आहेत घरांचे चढते वाढते भाव नि माझा पगारही ठाऊक आहेच तुला.” “पण माज केवढा करते ती?” “आत्ता तरी तसं काही घडलं नाहीये; विशेष असं!”
“अरे वा! म्हणजे मारामारी व्हायला हवी होती का आमच्यात? सासू विरुद्ध सून !” “तू राईचा पर्वत करतेय आई.”
“या वाक्यासरशी आईनं डोळ्यांना पदर लावला. तशी सून पुढे धावली. तिने सासूला नमस्कार केला. “चुकले चुकले. त्रिवार चुकले आई. माफ करा मला.” “ती नम्र झाली. सपशेल माघार ! सासू शहाणी होती. “दिलं सोडून !” ती म्हणाली सून कसबसं हसली. “चला, चहा करते. सगळ्यांना काहीच तर घडलं नाही.” “ सगळे सोडून ते घर तात्पुरते शांत झाले.