प्रा. प्रतिभा सराफ
भारतीय संस्कृतीनुसार काही सणवार हे विशिष्ट ऋतूंमध्ये साजरे केले जातात. त्यामागची काही कारणेही असतात, जी मुळातून समजून घेणे महत्त्वाचे आहे. आता आपण हिवाळा या ऋतूमध्ये येणाऱ्या संक्रांती या सणाविषयी जाणून घेऊ या. संक्रांती हा सण सौर्यचक्रानुसार साजरा केला जातो. अलीकडच्या काळात जसे हा सण साजरा करणारे आपल्याला आढळतात तसे या सणाची खिल्ली उडवणारेही आढळतात. कोणत्याही जाती धर्माशी निगडित न करता आपण या सणाचा विचार करू या. संक्रांती या सणाला तिळगूळ समारंभ वा हळदीकुंकू समारंभ असे म्हटले जाते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा स्त्रियांनी एकत्रित मिळून साजरा करण्याचा समारंभ मानला जातो; परंतु आजकाल हा एक सामाजिक मेळावा झाला आहे. ज्याच्यात स्त्री-पुरुष एकत्र येऊन हा सण साजरा करतात. महिला मंडळांबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, वेगवेगळे कट्टे, सोसायटीमधील संस्था आवर्जून हा सामाजिक मेळावा साजरा करतात. विचारपूर्वक काही ज्ञानात भर घालणारे कार्यक्रमही घडवून आणतात.
कोणे एकेकाळी केवळ स्त्रियांचा हा समारंभ होता. यामागचे कारण म्हणजे त्या काळात स्त्रिया नोकरी करत नव्हत्या. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडण्यासाठी आणि एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी ही सुसंधी होती; परंतु आता या स्त्रिया पुरुषांना सोबत घेऊन हा मेळावा साजरा करतात. काळाबरोबर बदलल्याचे हे चांगले द्योतक आहे. या सणाला काळ्या साड्या परिधान केल्या जातात. याचे कारण म्हणजे हा हिवाळ्याचा काळ आहे. थंडीचा काळ आहे. त्यामुळे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. ज्यामुळे काळे वस्त्र परिधान केल्यावर उबदार वाटते. या काळात त्वचा कोरडी होते आणि म्हणूनच शरीराला आतून बाहेरून स्निग्धता देण्यासाठी तिळासारख्या तेल पदार्थ आहारात घेण्याची आवश्यकता असते. तिळात अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-बी-सिक्ससारखी अनेक पोषक तत्त्वे सामावलेली असतात. आपण तिळाचा लाडू पाहिला, तर तो बेसनाच्या किंवा बुंदीच्या लाडू एवढा मोठा कधीच नसतो. त्यामुळे आपल्या पोटात किती प्रमाणात तीळ जायला पाहिजे, या प्रमाणातच तो बनलेला असतो. या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात व्यायाम केला जातो. हा शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचा काळ असतो. त्यामुळे आयुर्वेदानुसार, गूळ उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, हिवाळ्यात शरीरात ऊर्जा वाढविण्यास, शक्तिवर्धक म्हणून याचा उपयोग केला जातो. गुळाची शरीराला जी आवश्यकता असते, ती या तिळगुळाच्या लाडूतून आपल्याला मिळते. आपले आज्ञा चक्र संक्रमित करण्याचे कार्य हळदीकुंकू कपाळाला लावताना होते. आता हे चक्र कदाचित दाखवता येत नाही; परंतु त्याचे अस्तित्व आणि महत्त्व आपल्या योगशास्त्रात आहेच. हळदीकुंकू लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात; परंतु याचे काही शास्त्रीय कारण मला सापडले नाही. लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी सासरी, हलव्याचे दागिने घालून सुनेचे कौतुक केले जाते. हा सणासुदीच्या काळातील एक आनंदाचा भाग असतो. या काळात ‘बोरन्हाण’ नावाचा समारंभ तिळगुळ समारंभाच्या बरोबरीने म्हणजेच मकरसंक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान केला जातो. हा लहान मुलांचा (नवजात ते साधारण पाच वर्षांच्या वयापर्यंत) कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, चॉकलेट्स गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते. जे पदार्थ मुलांना आवडतात त्याची लूट केली जाते जेणेकरून तिथे आलेल्या मुलांनाही खूप आनंद आणि पौष्टिक असे पदार्थ खायला मिळतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘वाण’ एखाद्याला दान देण्यापेक्षा वाण देणे हे ते स्वीकारणाऱ्याच्या दृष्टीने सुद्धा आनंददायी असते. या काळात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, धान्य यांनी शेतकऱ्यांची घरे भरलेली असतात. याची बाजारातही उपलब्धता असते. अशा वेळेस ज्या गरिबांनी किंवा गरजूंना मानाने ‘वाण’ देतो. या वाणात पूर्वीच्या काळी धान्य, साखर, गूळ, चहा पावडर, साबण अशा स्वरूपाच्या रोजच्या वापरणीतील वस्तू असायच्या, ज्याचा त्या गरीब कुटुंबाला उपयोग व्हायचा. त्याचे स्वरूप बदलत जाऊन आता महागड्या वस्तूही दिल्या जातात. वाण काय द्यायचे, हे देणाऱ्याच्या परिस्थितीवर आणि इच्छेवर अवलंबून असते. माझ्या माहेरी किंवा माझ्या सासरी तिळगूळ समारंभ खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जायचा. आता कदाचित मला तेवढे जमत नाही; परंतु माझ्या घरात वावरणाऱ्या मदतनीस असोत, दारातील कचरा उचलणाऱ्या बाया असोत वा माझ्या जवळच्या मैत्रिणी असोत यांना मी तिळगुळाचे लाडू देताना सोबत आवर्जून काहीतरी देते. इथे मला देण्याचा खूप आनंद मिळतो. यावर्षी माझ्या घरातील एका मदतनीस बाईला मी सर्वांना दिली तशी कोल्ड क्रीमची बाटली दिली. स्वतःसाठी कधी तिने तशी आणली नसावी. तिला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी तिने मला तिचे, धुणेभांड्याची कामे करून रखरखीत झालेले दोन्ही हात पुढे करून दाखवले आणि म्हणाली, “बघा वहिनी माझी त्वचा किती मऊ झाली आहे!” तिच्या त्या हातांकडे, तिच्या फुललेल्या चेहऱ्याकडे पाहताना मला ‘संक्रांती’ हा सण साजरा केल्याचा भरभरून आनंद मिळाला. शेवटी सणांचा उद्देशच मुळी आनंदाची देवघेव आहे, नाही का?
pratibha.saraph@ gmail.com