Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?

मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ?
मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारा रस्ता सध्या सकाळी ७ ते रात्री १२ असा १७ तास वाहतुकीसाठी खुला असतो. हा रस्ता एप्रिल २०२५ पासून २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करत आहे. हा निर्णय घेण्याआधी सागरी किनारा मार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे देण्यात येणार आहे.



नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत किनारी रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ किमी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ ते जानेवारी २०२५पर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच मुंबईकर किंवा वाहनचालकांना फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याचीही कामे होत आहेत. कोस्टल रोड अर्थात किनारा रस्त्यावर वाहनांच्या वेगावर देखरेखीसाठी आठ ठिकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या मार्गालगतच असलेल्या अमरसन येथे सुरक्षा यंत्रणेची नियंत्रण कक्ष इमारत उभारली जात आहे. दोन आंतरबदल मार्गिकांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. ही कामे पूर्ण होताच हा मार्ग वाहनचालकांसाठी २४ तास खुला करण्याबाबत विचार सुरू आहे.
Comments
Add Comment