Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

युवकांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ठेवा - नितीन गडकरी

युवकांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ठेवा - नितीन गडकरी

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५’ मध्‍ये स्टार्टअप रंगले चर्चासत्र


नागपूर: वर्ष २०४७ मध्ये भारत विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर पुढे यावे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यासाठी स्टार्टअप मोठी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे या क्षेत्रातील युवकांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ठेवावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.


असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ-2025 खासदार औद्योगिक महोत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशी ‘स्टार्टअप क्षेत्रातील उद्यमशीलतेचा विकास’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी नो ब्रोकर डॉट कॉमचे अखिल गुप्ता, व्ही-थ्री व्हेन्चरचे अर्जुन वैद्य, हातून व्हेन्चरचे कार्तिक रेड्डी, युनिकॉर्न व्हेन्चरचे अनिल जोशी, कार्टेलचे प्रबंध संचालक प्रज्वल राऊत, नम्मा यात्रीचे संस्थापक शान एस एन, हॅपन अ‍ॅक्टरचे संस्थापक डॉ. शशीकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.



याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, स्टार्टअपच्या क्षेत्रात अनेकांनी हिमतीने काम करीत मोठे उद्योग उभे केले. या उद्योगांची गुणात्मक वाढ होऊन त्यातून रोजगार, स्वयंरोजगार आदी निर्माण होतील व विदर्भ समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल, ही खात्री आहे. अ‍ॅडव्हान्टेज विदर्भचा हाच मुख्य उद्देश आहे, असेही स्पष्ट केले.


याप्रसंगी बोलताना अखिल गुप्ता यांनी, आपण सर्वजण सर्वत्र ब्रोकरेज देतो आणि काम करवून घेतो. पण आम्ही नो ब्रोकर अ‍ॅप सुरू केल्यामुळे या क्षेत्रातील लोकांचा रोष आम्हाला सहन करावा लागला. पण आमचे आजमितीस जगात सर्वाधिक वापरात येणारे अधिकृत अ‍ॅप असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आयोजित गटचर्चेत अर्जुन वैद्य यांनी कोणत्याही प्रारंभाची कल्पना प्रथम येणे आवश्यक असते.


आपले प्रॉडक्ट उपयुक्त व वापरायोग्य आहे हे पटवून द्यावे लागते, असे सांगितले. अनिल जोशी यांनी, आपल्या प्रॉडक्टच्या वापरासाठी लोकांनी पैसे का द्यावे, ही बाब जाहिरात व प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून सांगावे लागते. त्याचप्रमाणे प्रीस्टेन केअर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. वैभव कपूर यांची मुलाखत पुनम खंडेलवाल यांनी घेतली.


या उपक्रमाबाबत बोलताना त्यांनी, हॉस्पिटल क्षेत्रात डॉक्टर, पेशन्ट, इन्शूरन्स कंपनी, तसेच स्टाफ आदींच्या समस्या सोडवाव्या लागतात. तरीही भारतात आरोग्यसेवा शिस्त आणि नियंत्रणासह राबविली जाते; पण अजूनही या क्षेत्रात उद्यमशीलतेला वाव आहे, असे स्पष्ट केले.


चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी डॉ. शशीकांत चौधरी यांनी सहभागींचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. चर्चासत्राचे संचालन सुरभी ताडफळे यांनी केले.

Comments
Add Comment