Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीValentine's Day : 'व्हॅलेंटाईन डे' आणि अनिष्ठ प्रथा!

Valentine’s Day : ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि अनिष्ठ प्रथा!

भारताची संस्कृती अत्यंत वैविध्यपूर्ण असून, असंख्य धर्म, परंपरा आणि प्रथा येथे एकत्र नांदतात. काही प्रथा आणि सण समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे असले, तरी काही रुढी अंधश्रद्धेवर आधारित असून महिलांवर अन्याय करणाऱ्या ठरतात. आधुनिक विज्ञान आणि प्रगतीच्या युगातही अशा अमानवीय प्रथांचा समाजात प्रभाव टिकून आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार पुढे नेण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने समतापूर्ण समाज घडवण्यासाठी या प्रथांचे उच्चाटन करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • राजेश सावंत

गुरुवारी, ६ फेब्रुवारी हा ‘स्त्री जननेंद्रिय विच्छेदनविरोधी शून्य सहिष्णुता दिन’ पाळण्यात आला. सध्या पाश्चात्य संस्कृतीतून आलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेम आणि आपुलकीचा दिवस साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ का साजरा केला जातो? या दिवसाचा इतिहास काय आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. दुर्दैवाने याविषयीच्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर कुठेही उपलब्ध नाही. विविध संकेतस्थळांवर व्हॅलेंटाईन डेचा इतिहास ‘मिस्ट्री’ म्हणून संबोधला गेला आहे. तिस-या शतकात रोम येथे व्हॅलेंटाईन नावाचा एक पाद्री (प्रीस्ट) होता. त्या काळातील ‘क्लॉडीयस २’ नावाच्या राजाने एक नियम लागू केला की, विवाहित पुरुषांपेक्षा अविवाहित पुरुष चांगले सैनिक असतात; म्हणून युवा मुलांनी विवाह करू नये. व्हॅलेंटाईनला हे अयोग्य वाटले आणि त्याने राजाच्या नियमाचे पालन न करता लपूनछपून प्रेमी युगुलांचे लग्न लावणे चालू केले. जेव्हा राजा ‘क्लॉडीयस २’ ला हे कळले, तेव्हा त्याने व्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश दिला. त्याची आठवण म्हणून व्हॅलेंटाईनची पुण्यतिथी साजरी करायला फेब्रुवारीमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो.
‘व्हॅलेंटाईन डे’ चे वेड आपल्या भारतीयांना इतके आहे की, पाश्चात्त्यांनाही आश्चर्य वाटेल असे ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत दररोज एक ‘डे’ साजरा केला जातो. रोझ डे, प्रपोझल डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, किस डे, हग डे आणि व्हॅलेंटाईन डे असे एकूण आठ दिवस लागोपाठ भारतात ‘डे’ साजरे केले जातात. एवढे दिवस विदेशातही असे ‘डे’ साजरे केले जात नाहीत. यावरूनच भारताची सामाजिक स्थिती किती खालवली आहे? हे लक्षात येते.
एका इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार व्हॅलेंटाईन डेच्या काही आठवड्यांपूर्वीच रोड रोमिओ बॉलीवूड चित्रपटातील नायक-नायिका यांच्या भेटीच्या गोष्टींप्रमाणे वागायला लागतात आणि मुलींना त्रास देतात. मुलींना या काळात घरातून बाहेर निघणे कठीण जाते. मुलाच्या इच्छेला नाकारल्यास काही मुले शिव्या देणे, शारीरिक आणि मानसिक छळ करणे, धमकावणे, बलात्कार करणे, पळवून नेणे, तोंडावर अॅसिड फेकणे अशा प्रकारे मुलींना त्रास देतात. अशा प्रकारच्या घटना एरव्हीही होतात; पण या काळात त्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समजते.
त्यामुळे केवळ बळजबरीने असे दिवस साजरे केल्याने आपल्यात प्रेम आणि मैत्री आपोआप कशी काय वाढणार? आपल्यात प्रेमभाव वाढण्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे काही काळाने आपल्यात प्रेमभाव निर्माण होतो.
इंटरनॅशनल बिझिनेस टाइम या इ-दैनिकानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुसाईड हेल्पलाईनला सर्वांत जास्त फोन येतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा आणि भग्न मानसिकता ही त्यामागची कारणे आहेत. असा हा समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा आणि अनेकांना निराशेत घेऊन जाणारा दिवस साजरा करण्यामागे आपण का लागलो आहोत? याचा सारसार विचार व्हायलाच हवा.
भारताची सांस्कृतिक विविधता इतकी विस्तृत आहे की, असंख्य धर्म, पंथ आणि त्यांच्या परंपरांसह आपण एक देश आहोत. देशाच्या कानाकोप-यात विविध सांस्कृतिक प्रथा अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत आणि त्या विशिष्ट समुदायाच्या मूल्यांशी निगडित आहेत. परंतु, त्यातील सर्व प्रथा समाजाच्या कल्याणासाठी तयार झालेल्या नाहीत किंवा कालांतराने त्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. काही परंपरा महत्त्वाच्या असल्या तरी, काही अंधश्रद्धा आणि रुढी या अन्यायकारक व अमानवीय ठरतात. धर्म आणि परंपरांच्या नावाखाली आजही महिलांवर अत्याचार सुरुच आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात विज्ञान आणि आधुनिकतेचा स्वीकार होत असताना, अशा रूढी आणि अंधश्रद्धा समाजात अजूनही टिकून आहेत. या अमानवीय प्रथांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, जेणेकरून समाज ख-या अर्थाने समतेच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल.

अशा काही प्रथा या बंद झाल्याच पाहिजेत…

१) पाय धुण्याची प्रथा
भारतात अनेक समुदायांमध्ये पाय धुण्याची प्रथा आढळते. या प्रथेनुसार, नवरीच्या वडिलांना नवऱ्याचे पाय धुवावे लागतात, आणि काही ठिकाणी नवरीलाही हे करावे लागते. प्राचीन काळी कदाचित वर अनवाणी फिरत असतील, पण आजच्या काळात बहुतांश वर गाडीतून किंवा घोड्यावर बसून येतात, त्यामुळे त्यांच्या पायांच्या स्वच्छतेचा प्रश्नच येत नाही. या प्रथेमुळे वर जणू काही नवरीच्या कुटुंबावर उपकार करत आहे, असा संदेश दिला जातो आणि नवरीच्या स्थानाला कमी लेखले जाते.
२) देवदासी प्रथा
दक्षिण भारतातील काही भागांमध्ये विशेषतः आंध्र प्रदेशात, मुलींना मंदिरात देवीला अर्पण करण्याची प्रथा होती. त्या मुलींचे अल्पवयातच देवाशी लग्न लावले जाई आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जात असे. या मुलींना खऱ्या विवाहाचा अधिकार दिला जात नाही. ही प्रथा कायद्याने बंदी घातली असली तरी काही भागांत अजूनही ती सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रथेला स्त्रीविरोधी ठरवत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
३) स्त्रियांच्या गुप्तांगाची सुंता (FGM)
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आपण कितीही पुढे गेलो असलो, तरीही आजही काही समाजांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अमानवीय प्रथांचा अस्तित्व कायम आहे. त्यातीलच एक क्रूर आणि अनिष्ट प्रथा म्हणजे ‘महिला जननेंद्रिय विच्छेदन’ (Female Genital Mutilation – FGM), ज्याला मुस्लिम समाजामध्ये ‘खतना’ म्हणून ओळखले जाते.
मुस्लिम समाजात लहान वयातच पुरुष आणि स्त्रियांचे जननांग कापण्याची प्रथा आजही रुढ आहे. या प्रथेमागे अनेक धार्मिक किंवा पारंपरिक, शास्त्रीय कारणे असली तरीही अशाप्रकारे शरीराचा भाग कापणे हे चुकीचेच आहे.
ही एक अमानुष प्रथा आहे, जी प्रामुख्याने आफ्रिका, ईशान्य आफ्रिका आणि भारतातील बोहरा समाजात आढळते. या क्रूर प्रथेनुसार, मुलींच्या जननेंद्रियाचा काही भाग सुरी किंवा ब्लेडने कापला जातो. सहा-सात वर्षांच्या मुलींवर हा अघोरी प्रकार घडतो. हे सर्व स्त्रियांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, ही प्रथा स्त्रीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असून तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम घडवते.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०१२ मध्ये ठराव पारित करून ६ फेब्रुवारी हा ‘स्त्री जननेंद्रिय विच्छेदनविरोधी शून्य सहिष्णुता दिन’ म्हणून घोषित केला. भारतामध्येही या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाऊदी बोहरा समाजातील महिलांच्या खतनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने देखील यावर कठोर भूमिका घेतली असून, जर समाजाने स्वयंप्रेरणेने ही प्रथा थांबवली नाही, तर कायद्याद्वारे कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
४) तीन तलाक
तीन वेळा “तलाक” हा शब्द उच्चारून मुस्लिम पुरुष पत्नीला घटस्फोट देऊ शकतो, तोही फोन, SMS किंवा सोशल मीडियावरून. ही जुनी आणि पुरुषप्रधान मानसिकतेची प्रथा मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक ठरते. अनेक मुस्लिम देशांनी तीन तलाकवर बंदी घातली असताना भारतात मात्र ही प्रथा सुरू होती. पण सर्वोच्च न्यायालयाने तिला घटनाबाह्य ठरवले आहे.
५) स्वतःला चाबकाने मारणे (सेल्फ-फ्लॅगलेशन)
ही प्रथा इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू धर्मांमध्ये दिसून येते. यात स्वतःला लोखंडी साखळ्यांनी किंवा ब्लेड लावलेल्या चाबकाने मारले जाते. शिया मुस्लिम संप्रदायात मुहम्मद पैगंबरांचे नातू हुसेन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून हे केले जाते. तर महाराष्ट्रात अंगावर चाबकाचे फटके मारून, पायातील चाळ वाजवुन, नागरिकांकडून पैसे मागणे, अशा प्रथा या विज्ञानयुगात बंद झाल्या पाहिजेत.
६) बाळांना मंदिराच्या छतावरून खाली टाकणे
ही अमानुष प्रथा दक्षिण भारतातील काही हिंदू समुदायांमध्ये आढळते, विशेषतः कर्नाटकात. यामध्ये नवजात बाळांना मंदिराच्या छतावरून खाली फेकले जाते आणि खाली उभ्या असलेल्या पुरुषांनी ते पकडायचे असते. हा प्रकार बाळाच्या आरोग्यासाठी चांगला समजला जातो आणि विवाहित जोडप्यांना अधिक मुलं होण्यासाठी शुभ मानला जातो.
७) अंगावर निखारे चालवणे (फायरवॉकिंग)
ही धोकादायक प्रथा हिंदू धर्मासह ग्रीस, बल्गेरिया, जपान, बाली, स्पेन आणि पाकिस्तानातील काही समुदायांमध्ये प्रचलित आहे. यात लोकांना जळत्या निखाऱ्यांवर चालावे लागते. तमिळनाडूमध्ये ‘थिमिथी’ नावाचा सण याच पद्धतीने साजरा केला जातो.
८) शरीरात धारदार वस्तू टोचणे (इंपेलिंग)
या प्रथेमध्ये शरीरात सुया, तलवारी, भाले, बंदुका आणि इतर तीक्ष्ण वस्तू टोचल्या जातात. यामध्ये सहभागी होणारे लोक देव त्यांच्यामध्ये संचारतो आणि ते वाईट शक्तींपासून सुरक्षित राहतात, असे मानतात.
९) विधवांसाठी अमानवीय रूढी
भारतात विधवा स्त्रीला समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालेला नाही. पती मृत्यूनंतर महिलांना पांढरी साडी घालण्यास भाग पाडले जाते, त्यांच्या सौंदर्य प्रसाधनांवर बंदी घातली जाते, आणि काही वेळा डोक्यावरील केसही कापण्यास भाग पाडले जाते. विधवा स्त्री अपशकुनी असल्याचे समजले जाते. जरी विधवांच्या पुनर्विवाहाची संकल्पना हळूहळू समाजात स्वीकारली जात असली, तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
१०) येडे स्नान
ही कर्नाटकातील अत्यंत वादग्रस्त प्रथा आहे, ज्यात भाविक मंदिरात अर्पण केलेल्या प्रसादावर लोळतात. याचे मूळ स्वरूप ‘माडे स्नान’ होते, जिथे ब्राह्मणांनी उरलेल्या अन्नावर लोकांना लोळवले जात असे. हा अत्यंत अपमानकारक प्रकार जातिभेद आणि वर्णव्यवस्था अधिक घट्ट करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -