मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही महत्त्वाची माहिती एक्सवर दिली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या महिलांना वगळण्यात आले असल्याचे ट्विट केल्यानंतर आदिती तटकरे यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत मिळालेला लाभ हा परत घेतला जाणार नसल्याची माहिती त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही.
तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यातून लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी !
असे त्यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही.
तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 7, 2025
लाडकी बहिण योजनेतून ५ लाख महिलांना वगळणार
याआधी आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिलांना वगळले जाणार आहे. राज्यातील सुमारे 5 लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करीत उपरोक्त माहिती दिली.
यासंदर्भातील आपल्या पोस्टमध्ये सुश्री तटकरे म्हणाल्या की, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. पुढे त्यांनी यापूर्वीच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळल्याचेदेखील सांगितले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २ लाख ३० हजार. तसेच ज्यांचे वय ६५ वर्षांहून अधिक असलेल्या १ लाख १० हजार महिला. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १ लाख ६० हजार अशा एकूण ५ लाख अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.