बांधकाम साईटवर पाळत ठेऊन पोलिसांनी केली कारवाई
नाशिक : नाशिक पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अवैधरित्या घुसखोरी करून शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादशी नागरिकांना अटक केली. हे सर्व बांगलादेशी नागरिक शहरातील विविध भागातील बांधकामाच्या साइटवर आपली ओळख लपवून राहत होते. (Nashik News)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयित घुसखोर नागरिकांवर हुशारीने पाळत ठेवली होती. या कामगिरी दरम्यान गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी साईट सुपरवायझर, बांधकाम मजूर यांचे वेशांतर केले होते.
पथकाने आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकाम साइटवर जाऊन सदर बांगलादेशी घुसखोरांच्या वास्तव्याची खातरजमा केली. सदर व्यक्ती बांग्लादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न होतात तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयित लोकांना ताब्यात घेण्यात आले.
सुमन कलाम गाझी (वय २७), अब्दुल्ला अलीम मंडल (३०), शाहीन माफिजुल मंडल (२३), लासेल नूर आली शंतर (२३), असाद अर्शद अली मुल्ला (३०), अलीम सुआन खान (३२), अल अमीन आमिनूर शेख (२२) व मोसिन मोफिजुल मुल्ला (२२) अशी या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. त्यांच्याजवळ भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मागितला असता तो ते सादर करू शकले नाहीत. तसेच दोन जणांकडे आधार कार्ड मिळाले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची अधिक चौकशी केली असता बांगलादेशातील एका व्यक्तीने त्यांना सीमापार करण्यास मदत केल्याचे सांगण्यात आले. यातील आरोपी सुमन गाझी हा सर्वप्रथम भारतात आला व त्यानंतर त्याने त्याच्या संपर्कातून उर्वरित आरोपींना भारतात आणि पुढे नाशिक मध्ये आणले. (Nashik News)
बांगलादेशी नागरिकत्वाचे सापडले पुरावे
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रविण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, किशोर देसले, बाळु बागुल, नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार गणेश वाघ, समिर चंद्रमोरे, मनिषा जाधव, वैशाली घरटे, अतुल पाटील, गौरख खांडरे, युवराज कानमहाले यांच्या पथकांनी केली. ताब्यात घेतलेल्या घुसखोरांकडे ते बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे सापडले आहेत. बांगलादेश सरकारची अधिकृत ओळखपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या सर्व घुसखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार पुढील तपास करीत आहेत.