परभणी: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आज गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला आहे. नांदेड येथील एका कार्यक्रमात कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.श्री. कदम हे खासदार संजय जाधव यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
विशाल कदम हे बऱ्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मशालला सोडचिठ्ठी देऊन धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा होती. अखेर आज गुरुवारी sत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश घेतला. यावेळी त्यांच्या समवेत गणेश कदम, माऊली भोसले, नवनाथ पारवे आदी परभणी जिल्ह्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते.कदम यांनी सेनेच्या ‘उबाठा’ गटाकडून नुकतीच गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. निवडणुकीतील पराभवानंतर ते अस्वस्थ होते. राजकीय पर्यायाच्या शोधात असताना त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
Nashik News : नाशिक शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांनी गेल्या काही दिवसात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय लागोपाठ घेतला आहे. सुरुवातीला संजय साडेगावकर यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आता अजीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख ए.जे. बोराडे यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. बोराडे यांचा मंठा हा तालुका परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. परभणी लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हाप्रमुखांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.