Monday, September 15, 2025

कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा

कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा
जॉर्जिया : अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात १०० पेक्षा जास्त पिटबुल कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे लागतील एवढी मोठी शिक्षा झाली आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. व्हिंसेंट लेमार्क बुरेल नावाच्या ५७ वर्षाच्या व्यक्तीला कुत्र्यांची झुंज लावल्याप्रकरणी ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
कुत्र्यांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रात काम करणाऱ्या व्हिंसेंट लेमार्क बुरेलने संधी साधून ९३ वेळा पिटबुल कुत्र्यांची झुंज लावल्याचे पॉल्डिंग काउंटी येथील न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणात न्यायालयाने प्रत्येक झुंजीसाठी स्वतंत्रपणे दोषी ठरवत प्रत्येकी पाच या प्रमाणे ४६५ वर्षांची शिक्षा ठोठावली. तसेच प्राण्यांच्या बाबतीत क्रूरपणे वागल्याप्रकरणी १० प्रकरणांमध्ये प्रत्येकी एक अशा प्रकारे आणखी दहा वर्षांची शिक्षा दिली. यामुळे व्हिंसेंट लेमार्क बुरेलला एकूण ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. कुत्र्यांची बेकायदा झुंज लावल्याप्रकरणी शिक्षा झाल्याचे सर्वात मोठे उदाहरण असे व्हिंसेंट लेमार्क बुरेलच्या बाबतीत घडलेल्या घटनेचे वर्णन करावे लागेल. या प्रकरणात याचिकाकर्ता केसी पगनोत्ता यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. प्राण्यांच्या बाबतीत क्रूरतेने वागणाऱ्याला न्यायालयाच्या निर्णयाने कडक इशारा दिला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोर निर्णय व्हायला हवे; असेही याचिकाकर्ता केसी पगनोत्ता म्हणाले. तर व्हिंसेंट लेमार्क बुरेलच्या वकिलाने न्यायालयाच्या निर्णयाला लवकरच आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.  
Comments
Add Comment