मुंबई : टोरेस घोटाळ्यात सहभागी असल्याच्या संशयावरुन मुंबई पोलिसांनी युक्रेनच्या आर्मन अतेन या अभिनेत्याला मालाड मालवणी येथून अटक केले आहे. या अभिनेत्याने बनावट जन्मदाखला दाखवून भारतीय असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात आर्मन अतेन युक्रेनचा आहे. त्याने बनावट जन्मदाखला दाखवून भारतात आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आणि इतर सरकारी कागदपत्रे तयार करुन घेतली होती. मुंबई पोलिसांनी महापालिका प्रशासनाच्या मदतीने पडताळणी केली आणि बनावट जन्मदाखला दाखवून आर्मन अतेन फसवणूक करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
टोरेस घोटाळ्यात आतापर्यंत सहा अटकेत
दी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘टोरेस ज्वेलरी’ या ब्रँडखाली गुंतवणुकीच्या खोट्या योजना राबवून गुंतवणूकदारांची एक हजार कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आर्मनसह सहा आरोपी अटकेत आहेत.
काय आहे टोरेस घोटाळा ?
टोरेस घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक बनावट कंपन्यांमध्ये वळते करण्यात आले. या आर्थिक अफरातफरीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. पैसे नेमके कुठे – कुठे गेले आहेत याचा तपास सुरू आहे. गुंतवणूकदारांनी अॅड. सनी पुनमिया यांच्यामार्फत दोन अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही अर्जांवर १० फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. टोरेस घोटाळ्यातील फरार असलेल्या आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी याचिकाकर्ते करत आहेत. घोटाळ्यातील पैशांचा प्रवास कुठे व कसा झाला आहे याचा तंत्रज्ञानाच्या मदतीने सखोल तपास करुन ही माहिती न्यायालयात सादर करावी, अशीही मागणी टोरेस घोटाळ्याचा फटका बसलेले गुंतवणूकदार करत आहेत.