मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल आता सुपरफास्ट आणि आलिशान होणार आहे. या लोकल सेवेत लवकरच नवे आणि प्रवाशांच्या पसंतीला येतील असे बदल करण्याची भूमिका रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. त्यातूनच खचाखच भरलेल्या डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेसे ऑक्सिजन मिळू शकेल अशा पद्धतीची रचना असणारे नवे डबे सेवेत आणले जातील. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास मोकळा होऊ शकेल. या बदलासोबतच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर नवे टर्मिनल उभारण्यासह उपनगरीय रेल्वे सेवेत नवे बदल होणार आहेत, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. वैष्णव यांनी दिलेल्या माहितीमुळे दररोज लोकलने प्रवास करणारे सुमारे ७५ लाख प्रवासी निश्चितच सुखावतील.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ७७८ कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये एक लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या साडेदहा वर्षांमध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात दोन हजार १०५ कि.मी. लांबीचे नवे रेल्वे मार्ग टाकण्यात आले. त्यातील तीन हजार ५८६ कि.मी.सह शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. सध्या महाराष्ट्रात एक लाख ५८ हजार ८६६ कोटींच्या चार नव्या प्रकल्पांसह सहा हजार ९८५ किमीच्या एकूण ४७ प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सोमवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुंबई लोकलच्या सुधारणासाठी नवीन कोणत्या गोष्टी समोर आल्या, तर मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी १६ हजार ४०० कोटी खर्चून ३०१ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. प्रवाशांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार आता लोकलचा वेग वाढविण्याचे काम करण्यात येत आहे. दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा विचार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन लोकलमधील वेळ १८० सेकंदाचा आहे, त्याला आधी १५० सेकंद करण्यात येईल. त्यानंतर हा वेळ १२० सेकंदांवर आणला जाणार आहे. त्याशिवाय गर्दी कमी करण्यासाठी लोकल वाढविण्यात येणार आहेत, मुंबईत सध्या दररोज ३ हजार गाड्या धावत असून त्यात आणखी ३०० गाड्यांची भर घालण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तिन्ही मार्गांवर लोकलला कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे.
मुंबईबरोबर महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे वाढवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न दिसून आला आहे. पाच हजार ५८७ कोटी रुपये खर्चून राज्यातील १३२ अमृत स्थानके विकसित केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमध्ये ११ वंदे भारत धावत आहेत. नागपूर रेल्वे स्थानकाच्या ५८९ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पूर्व भागाच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे ३६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागाचे, एक हजार ८१३ कोटी खर्चाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे, ३५९ कोटी खर्चाच्या छत्रपती संभाजीनगर स्थानकाच्या दक्षिण भागाच्या इमारतीचे आणि १८२ कोटी खर्चाच्या जालना स्थानकाच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापूर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले.
तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.
त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात, उत्तर प्रदेशातील रेल्वे बजेटमध्ये १८ पट वाढ झाली, गेल्या १० वर्षांत यूपीमध्ये ५,२०० किमी नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले. जो संपूर्ण स्वित्झर्लंड किंवा बेल्जियमच्या रेल्वे ट्रॅकच्या लांबीपेक्षा जास्त आहे. येत्या वर्षभरात प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी १७,५०० नॉन-वातानुकूलित जनरल कोच तयार केले जाणार आहेत. ५० नमो भारत ट्रेन, आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या १०० वातानुकूलित अमृत भारत गाड्या आणि २०० वंदे भारत गाड्या तयार केल्या जात आहेत. अन्नाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ६०० बेस्ट किचन सुरू केले जाणार आहेत. कमी अंतर असलेल्या दोन शहरांमध्ये धावणाऱ्या नमो भारत गाड्यांच्या संख्येतही आणखी ५० गाड्यांची भर पडणार आहे, तर श्रमिक वर्गासाठी आणखी १०० अमृत भारत गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. वंदे भारतच्या २०० नव्या गाड्यांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. हे सर्व पाहता, रेल्वेच्या प्रकल्पांना रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णवांकडून बुस्टर डोस दिला जात असल्याचे दिसून येत आहे.