केरळ : अंगणवाडीत पोषण आहार देण्याचा उद्देश बालकांची भूक आणि कुपोषणाचा सामना करणे हा आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना पोषण आहार देण्यासोबतच, आरोग्य तपासणी, लसीकरण, आरोग्य संदर्भ सेवा, पोषण आरोग्य विषयक शिक्षण या सेवाही दिल्या जातात.
मुलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ मुलांसाठी नियोजित केले जातात. अशातच केरळातील एका चिमुकल्याने मला उपमा नको मला बिर्याणी किंवा चिकन फ्राय द्या असं म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अंगणवाडी आहारात बदल करण्याचा निर्णय केरळ या राज्याने घेतला आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला चिमुकला ?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मुलाच नाव थरजूल शंकर आहे. तो त्याच्या आईकडे बिर्याणीसाठी हट्ट करत आहे. त्याचबरोबर तो म्हणाला,”मला अंगणवाडीतला उपमा नको मला बिर्याणी आणि फ्राय चिकन हवं आहे.” या निरागस मागणीची दखल केरळच्या महिला बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली आहे.
वीणा जॉर्ज म्हणाल्या सरकारी नियमाप्रमाणे सकस आहार म्हणून मुलांना अंडी आणि दूध देण्यात येते. आता आम्ही आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी म्हटलं आहे. चिमुकल्याची ही मागणी भविष्यात पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत आहेत.