Tuesday, July 1, 2025

Maharashtra Kusti 2025 : शिवराज राक्षेच्या वादात चंद्रहार पाटीलची उडी; दोन्ही गदा परत करण्याचा घेतला निर्णय

Maharashtra Kusti 2025 : शिवराज राक्षेच्या वादात चंद्रहार पाटीलची उडी; दोन्ही गदा परत करण्याचा घेतला निर्णय

सांगली : यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. या लढतीदरम्यान झालेल्या राड्यावेळी शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली. या कृत्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.


या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. अशातच चंद्रहार पाटील याने त्याला मिळालेल्या दोन्ही गदा परत करण्याचा निर्णय घेतला आहे.



काय म्हणाला चंद्रहार पाटील ?


एका व्हिडिओमध्ये बोलताना चंद्रहार पाटील म्हणाला, एका डिबेट कार्यक्रमामध्ये काका पवार, संदीप भोंडवे आणि शिवराज राक्षे होते, यावेळी २००९ ला माझा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सर्व पंच कमिटीने पराभव केला याबद्दल काका पवारांना विचारल्यावर त्यांनी मान्य केलं की चंद्रहारवर अन्याय झाला. शिवराज राक्षे हा त्यांचा पठ्ठा, त्याच्यावर अन्याय झाला की ते माध्यमांना सांगत आहेत. पण जेव्हा माझ्या बाबतीत हे घडत असताना तुम्ही तिथं हजर होते. शरद पवार साहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मला हरवल्यानंतर मी आत्महत्येच्या विचारत होतो. आजही मी कोणत्या कुस्तीच्या मैदानामध्ये जात नाही, कारण माझ्या मनामध्ये भीती बसली आहे.



एखाद्या पैलवानाची अशी परिस्थिती का होते? शिवराज राक्षेवर ही परिस्थिती आल्यावर काका पवारांना यांचं दु:ख कळालं. आज त्यांनी मान्य केलं की माझ्यावर अन्याय झाला होता. तशाच पद्धतीने त्यावेळच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावं की चंद्रहारवर अन्याय झाला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आलं. म्हणजे माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल नाहीतर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदांची गरज नाही. मी जे आजपर्यंत केलं ते प्रामाणिकपणे करून माताची सेवा करून या पदापर्यंत पोहोचलो होतो. अन्याय होऊन मी एखाद्या विशिष्ट विचारापर्यंत गेलो होतो. आयुष्यभर जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करणार.


दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यातून कसा बाहेर पडणार आणि शिवराज राक्षेला न्याय मिळणार का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >