सोलापूर : केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ७८४ कोटींचा निधी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेट कंपनीला मिळाला. यामाध्यमातून शहरात ७३१ कोटी रुपये खर्च करून ४६ विकासकामे करण्यात आली. सर्व कामे पूर्ण झाल्याने महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत. निधीही संपला, नवीन कामही नाही. त्यामुळे केंद्राच्या चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे.
देशातील दहा स्मार्ट शहरामध्ये सोलापूराचा समावेश होता. केंद्रशासन ७० टक्के राज्य शासन ३० टक्के आणि महापालिकेचा हिस्सा १० टक्के हिस्सा या माध्यमातून शहरात विकासकामे केली जाणार होती. यामध्ये ४६ विकास कामाचा डिपीआर तयार करण्यात आला. यातील समांतर जलवाहिनी वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीने सर्व कामे महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत.
असा मिळाला निधी
केंद्र शासनाकडून या योजनासाठी ३९२ कोटी, राज्यशासन १९६ कोटी, महापालिकेचा हिस्सा १९६ कोटी, असा एकूण ७८४ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ७३१ कोटींचा निधी खर्च झाला आहे. ५२.७१ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्यातून इतर कामे चालू आहेत.
मार्चअखेर सगळे संपणार
स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमतून उजनी समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे. ३१ मार्च अखेर मक्तेदाराला मुदत वाढ दिल्याने काम संपणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या सीईओंची दोन महिन्यांसाठी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे मार्चअखेर सोलापूर स्मार्ट सिटीचा बाजार उठणार असल्याचे बोलले जात आहे.