महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आत्ताच्या फडणवीस सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाला राज्यातील राजकारणात महत्त्व प्राप्त झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय नेतृत्वाचा उदय हा ठाण्यातून आहे आणि त्यामुळे ठाणे शहर त्या पाठोपाठ ठाणे जिल्हा हा एक हाती एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे नगरसेवक पदापासून ते थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणे हे एकनाथ शिंदे यांना शक्य होऊ शकले याची कबुली दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यांच्या मुलाखतीमध्ये बऱ्याच वेळा यापूर्वी दिलेली आहे. आणि त्यामुळेच भाजपाने देखील ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या संघटन वाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
सुनील जावडेकर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषता महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका तुर्त जरी लांबणीवर पडल्या असल्या तरी पावसाळ्यानंतर त्या कधीही होऊ शकतात आणि त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाला स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक यश मिळवणे हे विधानसभेत आणि लोकसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. शत प्रतिशत भाजपा हे भाजपा नेत्यांचे स्वप्न आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना बरोबर घेतल्यानंतरही भाजपा १३२ आमदार निवडून आणू शकला आणि जर अपक्षांचे मिळालेले पाठबळ लक्षात घेतले, तर आजमीतिला राज्यात भाजपाचे १३८ आमदार आहेत. स्वबळाच्या सरकारसाठी भाजपाला महाराष्ट्रात केवळ आणखी सात आमदारांची आवश्यकता आहे. भाजपा नेतृत्वाने भाजपाच्या ज्या नेत्यांना महायुतीतील जागा वाटपाच्या अडचणीमुळे भाजपकडून उमेदवारी देणे शक्य नव्हते अशांना शिवसेना आणि राष्ट्रवादीतून दिलेली उमेदवारी लक्षात घेता स्वबळाच्या १४५ या मॅजिक फिगरसाठी लागणारे उर्वरित सात -आठ आमदार हे भाजपा कधीही उपलब्ध करू शकते अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे वास्तविक जर विचार करायचा झाला तर शतप्रतिशत भाजपा ही जी काही भाजपा नेतृत्वाची २००९ ची घोषणा होती ती २०२४ च्या सुमारास ९५% पूर्ण झाली आहे असे म्हटले तर कोणालाही आश्चर्य वाटू नये.
महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा आणि त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये झालेल्या बंडाळीचा सर्वाधिक लाभ जर कोणाला मिळाला असेल तर तो भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून अधिक स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकारणात जे महत्त्व वाढले त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन हे हयात असल्याच्या काळापासून युतीमध्ये कुरबुरी, वाद, चढाओढी आणि कुरघोड्यांचे राजकारण हे स्थानिक पातळीवर सुरूच होते. यासाठी अगदी १९९६ साली ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी परंपरागत भाजपाकडे असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा अक्षरशः भाजपाकडून शिवसेनेकडे खेचून घेतला आणि तेव्हापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील ठाण्यातील नाते हे प्रामुख्याने जरी वरकरणी मित्रत्वाचे वाटले तरी आतून ते कुरघोडीचेच राहिलेले आहे. त्यामुळेच शत प्रतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपाने ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे असे दिसते. त्यामुळेच नवी मुंबईचे गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद तर बहाल करण्यात आलेच मात्र त्याचबरोबर त्यांना वनखात्यासारखे मत महत्त्वपूर्ण खाते देखील देण्यात आले. त्याचबरोबर पालघर या जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गणेश नाईक यांच्याकडेच आहे.
गणेश नाईक हे केवळ नवी मुंबईचे नव्हे तर ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखून असणारे नेतृत्व आहे. आक्रमक आणि परखड बोलणे हा गणेश नाईक यांच्या स्वभावाचा स्थायीभाव आहे. भाजपाने गणेश नाईक यांना मंत्रिपद देताना त्यांच्यातील या गुणांचा विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे गणेश नाईकांवर आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजपाचे संघटन अधिकाधिक बळकट करणे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांमधील वनमंत्री गणेश नाईक यांची जर आपण जाहीर विधाने पाहिली तर त्यांनी ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये भाजपा बळकट करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. जरी ते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरीदेखील त्यांनी ठाणे जिल्ह्यात देखील तीन महिन्यातून एकदा जनता दरबार घेण्याचे जाहीर केले आहे, तर नवी मुंबईमध्ये ते दर महिन्याला जनता दरबार घेणार आहेत. पालघर मध्ये ते स्वतःच पालकमंत्री असल्यामुळे पालघरच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल हा शेवटी पालकमंत्री या नात्याने गणेश नाईक यांच्याकडे असणार आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महापालिका निवडणुका जर भाजपने स्वतंत्र आणि स्वबळावर लढवल्या तर त्याच्यासाठी देखील आपली संपूर्ण तयारी असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
देशात आणि महाराष्ट्रात आता २०२९ शिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नाहीत हे जर लक्षात घेतले आणि २०२९ ची भाजपाची शतप्रतिशतची तयारी लक्षात घेतली, तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था या अधिकाधिक संख्येने भाजपाकडे कशा राखता येतील हे पाहणे भाजप नेतृत्वाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठीच गणेश नाईक यांनी जो स्वबळाचा नारा दिला आहे त्याला त्यामुळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपामधील एका मोठ्या वर्गाचे असे म्हणणे आहे की, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत जे प्रचंड आणि घवघवीत यश मिळाले त्यामध्ये भाजपाचा वाटा मोठा आहे. भाजपाच्या भक्कम पाठबळामुळेच शिवसेनेत फाटा फूट असताना देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात मोठे यश मिळाले. त्यात तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजपाला झालेला उपयोग हा मर्यादित आहे. आणि त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जर भाजपाने स्वबळावर लढवल्या तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोबळ तर वाढेलच मात्र त्याच बरोबर पक्ष संघटना देखील अधिक भक्कम होईल आणि त्या दृष्टीने भाजपा नेतृत्व वाटचाल करत आहे. मात्र त्याचबरोबर हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील महापालिका नगर परिषदा आणि ठाणे जिल्हा परिषद देखील शिवसेनेच्या म्हणजेच पर्यायने एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. भाजपाने ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करताना एकीकडे नवी मुंबईत गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना भक्कम पाठबळ दिले आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीकर आमदार व राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष करत त्या भागातही भाजपाचे वर्चस्व कसे वाढीस लागेल याकरता व्यूहरचना केली आहे. भाजपामधील या महत्त्वपूर्ण घडामोडी लक्षात घेतल्या तर आगामी काळात ठाणे जिल्हा हा राज्याच्या राजकारणातील घडामोडींचा प्रमुख केंद्र असेल असे समजायला हरकत नाही.