नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Election 2025) सोमवारी संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार संपला. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल ८ वाजता जाहीर केला जाईल. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीचे १.५६ कोटी मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करतील.
एक्झिट पोलवर कधीपर्यंत बंदी?
याआधी निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर प्रतिबंध लावले आहेत. या संबंधामध्ये दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत.
मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ
दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ तयार करण्यात आले आहेत. ८३.७६ लाख पुरूष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ७३३ मतदान बूथ हे दिव्यांग लोकांसाठी ठरवण्यात आले आहेत.
६९८० लोकांनी घरातून केले मतदान
वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा आहे. या सुविधेंतर्गत पात्र मतदारांपैकी ६९८० लोकांनी आपले मतदान आधीच केले आहे. घरातून मतदानाची सुविधा २४ जानेवारीपासून सुरू झाली होती. ही सुविधा ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.