मुंबई : व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला या १६ किमी. च्या मार्गावर ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली विद्युत लोकल धावली. ही भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाची सुरुवात (electrification of Indian Railways) होती. या ऐतिहासिक घटनेला सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ रोजी १०० वर्षे झाली. या १०० वर्षात भारतीय रेल्वेत अनेक क्रांतीकारी बदल झाले.
भारतात विजेवर पहिल्यांदा लोकल धावली त्यावेळी १.५ केव्ही डीसी ओव्हरहेड वायर प्रणालीचा वापर करण्यात आला. या रेल्वेनं ८० किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्याची क्षमता दाखवली. त्या काळात ब्रिटीशकालीन लोकलमध्ये चार डबे होते. पोलाद आणि लाकूड यांचा मेळ साधून हे डबे तयार करण्यात आले होते. रेल्वेच्या डब्याचे फ्लोरिंग लाकडाचे होते. बाकड्यांसाठी पण लाकडू वापरले जात होते. उर्वरित डबा हा पोलादाचा वापर करुन तयार केला जात होता. वाफेच्या इंजिनाच्या तुलनेत विजेवर चालणारे इंजिन जास्त वेगवान होते. शिवाय वाफेच्या इंजिनमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेचे इंजिन हा उत्तम पर्याय असल्याचे लक्षात आले. यामुळे रेल्वेच्या विद्युतीकरणाला वेग देण्याचा निर्णय झाला. मध्य रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण २३ फेब्रुवारी २०२३ रोजी १०० टक्के पूर्ण झाले. याआधी १९२७ मध्ये आठ डब्यांची १९६१ मध्ये नऊ डब्यांची, १९८६ मध्ये बारा डब्यांची लोकल सुरू झाली.
इलेक्ट्रिक रेल्वेची सुरुवात जर्मनीत झाली. जर्मनीनं १८७९ मध्ये पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरू केली. इलेक्ट्रिक रेल्वे सुरू करणारा भारत जगातील २४ वा आणि आशियातील तिसरा देश झाला. मुंबईतील रेल्वेच्या विद्युतीकरण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर, दक्षिण आणि पूर्व भारतातील विद्युतीकरण करण्यास सुरुवात झाली. दक्षिण भारतातील मद्रास म्हणजे आताचे चेन्नई – तांबरम मार्गाचे विद्युतीकरण १९३१ मध्ये करण्यात आलं. भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत देशात ३८८ किमी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. त्यानंतर १९५० मध्ये कोलकात्यात विद्युतीकरणाला गती मिळाली. पुढं डिसेंबर १९५७ मध्ये हावडा ते शियोराफुली दरम्यान पूर्व भारतातील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग सुरू झाला.
महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री
देशातील संपूर्ण रेल्वे जाळ्याच्या विद्युतीकरणाचे काम २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अनेक ठिकाणी काम वेगाने सुरू आहे. भारतीय रेल्वेने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर अधिकाधिक करुन वंदे भारत आणि बुलेट ट्रेनसारख्या हायस्पीड रेल्वेगाड्यांसाठी स्वच्छ ऊर्जा प्रणाली विकसित करण्यावर भर दिला आहे. रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे. भारतीय रेल्वे हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत यासाठीचे काम सुरू आहे. हायड्रोजनवर धावणारी ट्रेन सुरू झाली तर शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साधण्यास मदत होईल. रेल्वेने १२०० अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन वापरणाऱ्या ३५ हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. लवकरच हरियाणामध्ये जिंद-सोनीपत मार्गावर पहिल्या भारतीय हायड्रोजन ट्रेनची चाचणी होणार आहे.