कथा – प्रा. देवबा पाटील
आनंदराव हे एक सेवानिवृत्त शास्त्रज्ञ होते. ते दररोज सकाळी आपल्या नातवासोबत फिरायला जात होते. नातूही त्यांना आपल्या शंका विचारून ज्ञानार्जन करून घेत होता.
“बरे, थंडीच्या दिवसांत सकाळी बरेचजण नेहमी हातावर हात का चोळतात?” स्वरूपने शंका काढली.
“खूपच बारीक लक्ष आहे रे तुझे.” आनंदराव म्हणाले, “थंडीच्या दिवसांत सकाळी सकाळी पुष्कळ लोक आपले हात नेहमी हातांवर चोळतात, कारण त्यांच्यामध्ये घर्षण होते नि त्या घर्षणाने हातांमध्ये उष्णता निर्माण होते. ती उष्णता सर्व शरीरात पसरल्यामुळे शरीरातील थंडी थोडीशी कमी होते व शरीराला ऊबदार वाटते.”
“आजोबा, तुम्ही मला स्वेटर व मफलर घालायला सांगितल्याने मला थंडी कमी वाजते. पण हे कसे होते?” स्वरूपने विचारले.
“लोकरीपासून तयार केलेले कपडे हे उष्णतारोधक असतात. त्यामुळे आपण जेव्हा स्वेटर घालतो किंवा घोंगडे अंगाभोवती गुंडाळतो तेव्हा ते स्वेटर किंवा घोंगडे बाहेरच्या थंड हवेस प्रतिबंध करते व शरीरातील उष्णतेस बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे शरीर ऊबदार राहते व आपणास थंडी कमी वाजते. म्हणून हिवाळ्याच्या दिवसांत लोक स्वेटर घालतात, कानाला मफलर गुंडाळतात व रात्री झोपताना घोंगडे वा ब्लँकेट पांघरतात.” आनंदरावांनी स्पष्टीकरण दिले.
“आजोबा, हिवाळ्यात स्वेटर, मफलर वापरतात, तर मग उन्हाळ्यात पांढरे कपडे का वापरतात?” स्वरूपने प्रश्न उकरला.
आनंदराव म्हणाले, “पांढरा कपडा प्रकाश किंवा उष्णता किरण शोषून न घेता त्याचे परावर्तन करणारा असतो. उन्हाळ्याच्या दिवसात असे पांढरे कपडे अंगात घातल्याने बाहेरची उष्णता कपड्यात शोषली न जाता कपड्यावरून परावर्तित होते. त्यामुळे आपले शरीर जास्त तापत नाही. त्यातही असे कपडे चांगले सुती, सैल व सच्छिद्र असले तर उन्हाळ्यात अंगाभोवती चांगली हवा खेळते व त्वचेतून बाहेर पडणाऱ्या घामाची वाफ होऊन ती बाहेर जाणे सोयीचे होते. कोणत्याही द्रवाचे वाफेत रूपांतर होण्यासाठी सुप्त अशा उष्णतेची गरज असते. घामाचे वाफेत रूपांतर होण्यासाठी लागणारी उष्णता आपल्या शरीरातूनच घेतली जाते. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होते नि आपल्याला थोडे बरे वाटते.”
“ही थंडी नाहीशी का करता येत नाही आजोबा?” स्वरूपने विचारले.
“थंडी नाहीशी करता येत नाही त्याचे कारण म्हणजे थंडी ही काही एखादी वस्तू किंवा पदार्थ नाही की त्याला नाहीसा करता येईल. वातावरणातील उष्णता कमी होणे यालाच आपण थंडी पडणे म्हणतो. मी तुला आताच सांगितले की, आपण हिवाळ्यात लोकरीचे गरम कपडे वापरतो ते बाहेरील थंडी शरीरात शिरू नये म्हणून नव्हे तर त्यांनी शरीरातील उष्णता बाहेर जात नाही. याउलट बर्फाला लाकडाच्या भुशात ठेवतात व त्याभोवती गोणपाट गुंडाळतात, कारण की, बाहेरील उष्णता बर्फात शिरून त्याचे पाणी होऊ नये हेच कारण असते. म्हणजे गरम कपडे किंवा पदार्थ वापरून आपण उष्णतेचेच संरक्षण किंवा निवारण करत असतो, थंडीचे नव्हे.” आनंदरावांनी सांगितले.
“आपल्या शरीरात थंडीने हुडहुडी का भरते? थंडीमुळे आपले शरीर का कुडकुडते?” स्वरूपने एकामागून एक दोन प्रश्न विचारले.
“थंडीने ज्यावेळी स्नायू आकुंचन पावतात, त्यावेळी शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी मेंदू मज्जातंतंूद्वारे सर्व स्नायूंना हालचाल करण्याचे आदेश देतो. स्नायूंच्या या सूक्ष्म हालचालींमध्ये म्हणजे कंपनांमध्ये स्नायूंचे वेगाने आकुंचन-प्रसरण होते. त्यामुळे संपूर्ण शरीरात हुडहुडी भरते आणि हातपाय कुडकुडल्यासारखे हलतात. याच कंपामुळे तोंडाच्या जबड्याचे स्नायूही हलू लागतात. त्यामुळे जबड्यांची वेगाने उघडझाप झाल्याने खालचे दात वरच्या दातांवर कडाकड आपटतात. या साऱ्या कुडकुडण्याच्या हालचालींमुळे शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते. कधीकधी अति तापामुळे किंवा भीतीमुळे सुद्धा अशीच हुडहुडी शरीरात भरते.” आजोबांनी सांगितले.
अशी प्रश्नोत्तरे करत करत ते दोघेही आजेनाते हसत खेळत फिरून आपल्या घरी परत आले.