कथा – प्रा. देवबा पाटील
दिवशी पुन्हा साऱ्यांना असे वाटले की, आज तर नक्कीच स्वरूप सकाळी उठण्याला चाट मारेल. कारण त्यांना स्वरूप किती आळशी आहे याची पूर्ण जाणीव होती. तसाही तो लहान व लाडका असल्यामुळे सारे त्याच्या आळसाकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळेच त्याला सकाळी उशिरा उठण्याची वाईट सवय लागून गेली होती. त्यांना असे वाटले की, नवतीचे नऊ दिवस असतात म्हणून तो दुसऱ्याही दिवशी म्हणजे काल सकाळी आजोबांसोबत फिरायला गेला होता. पण ते उठले तर त्यांच्यासोबत स्वरूपही उठून दत्त म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याने पटापट आपली सर्व तयारी केली. त्याच्यात झालेला हा सर्व बदल बघून तर साऱ्यांनाच आश्चर्य वाटू लागले व आनंदही झाला. त्याने स्वत:हून आजोबांना आवाज दिला, “आजोबा, माझी तयारी झाली.”
“ हो का बाळा, माझीही तयारी झाली. चल निघू या आपण.” आजोबा म्हणाले. “ आजोबा थंडी हिवाळ्यातच का पडते?” स्वरूपने प्रश्न केला.
“ पृथ्वी स्वत:भोवती व सूर्याभोवतीही फिरताना तिच्या अक्षाशी थोडी कलती होऊन फिरत असते. पृथ्वीच्या कलण्यामुळे पृथ्वीवर सूर्यकिरण हे नेहमी तिरपे पडतात. तिरपेपणाने ते पृथ्वीवर कमी जास्त प्रमाणात पडतात. पृथ्वीचा जो भाग सूर्यापासून दूर असतो त्यावर सूर्यकिरणं तिरपे व कमी पडत असल्याने तेथे प्रकाश कमी पोहोचतो. त्यामुळे त्या भागाचे तापमान हळूहळू कमी कमी होत जाते व त्या भागात हळूहळू थंडी वाढत जाते आणि त्या भागात हिवाळा ऋतू सुरू होतो.
हिवाळ्याच्या दिवसांत थंडी असल्याने त्या थंडीने वातावरणातील गारव्यामुळे ढगांतील जलबिंदूंचे हिमकणांत रूपांतर होते. असे अनेक हिमकण एकत्र आल्याने त्यांचे बर्फ बनते. ते बर्फ पृथ्वीवर पडतात व आणखी थंडी जास्तच वाढते.” आजोबांनी खुलासा केला.
“आजोबा, मग उन्हाळ्यात जास्त का तापते?” स्वरूपने विचारले.
“पृथ्वी स्वत:भोवती व सूर्याभोवतीही फिरताना तिच्या अक्षाशी थोडी कलती होऊन फिरत असते. पृथ्वीच्या कलण्यामुळे पृथ्वीवर सूर्याचे किरण काही ठिकाणी सरळ पडतात, तर काही ठिकाणी ते तिरपे पडतात. सूर्याचे किरण तेथे सरळ पडतात ते अंतर कमी असल्याने तेथे जास्त उष्णता देतात, तर जे अंतर जास्त असते तेथे किरण तिरपे पडत असल्याने तेथे कमी उष्णता देतात. जो भाग सूर्याकडे असतो तेथे सूर्याचे उष्ण किरण सरळ पडतात. तसेच तो भाग सूर्यासमोर जास्त वेळ राहतो. ह्या दोन्ही कारणांमुळे त्या भागाला सूर्याची उष्णता जास्त मिळते. म्हणून तेथे जास्त तापते व तेथे उन्हाळा असतो. तसेच तो भाग सूर्यापासून जवळ असल्याने जास्त वेळ उजेडात असतो म्हणून तेथे दिवस मोठा व रात्र लहान असते. आपल्याकडे ही स्थिती उन्हाळ्यात येते.” आनंदरावांनी सांगितले.
“आजोबा हिवाळ्यात आपणास थंडी वाजते; परंतु उन्हाळ्यात आपल्या शरीराचा दाह का होतो?” स्वरूपने प्रश्न केला.
“उन्हाळ्यात वाहणारे वारेसुद्धा उष्ण असतात. ते आपल्या शरीराच्या संपर्कात आले की आपल्या शरीराचे तापमान जास्त वाढवतात. तसे पाहता वारा आपल्या शरीरावरील घामाच्या बाष्पीभवनाचा वेग वाढवतो. पण येथे ह्या उष्ण वाऱ्यांनी शरीरावरील घामाचे बाष्पीभवन करून शरीरातील काढून घेतलेल्या उष्णतेपेक्षा वाऱ्यामुळे मिळालेली उष्णता जास्त असते. त्यामुळे शरीराचे तापमान कमी न होता उलट वाढते. म्हणून उन्हाळ्यात आपल्या शरीराचा दाह होतो.” आजोबांनी सांगितले.
घरी जाताबरोबर स्वरूप त्याच्या आईला म्हणाला, “आई आजोबांना तर खूप माहिती आहे गं. मला कालही खूप माहिती सांगितली आजोबांनी. आजही खूप गोष्टी सांगितल्या. आजोबांसोबत फिरायला जाताना मला विज्ञानाचे खूपच ज्ञान मिळते.”
“छान. मग रोज जायचे आजोबांसोबत फिरायला.” आई म्हणाली. “हो आई, मी कालच तर तुला सांगितले की, मी रोज आजोबांसोबत फिरायला जात जाईल.”
“”हो बाळा.”” आई म्हणाली.