Monday, June 30, 2025

Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये उद्या होणार तिसरे अमृत स्नान!

Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये उद्या होणार तिसरे अमृत स्नान!

प्रयागराज : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात (Mahakumbh Mela) तिसरे पवित्र अमृत स्नानाचे आयोजन वसंत पंचमीनिमित्त सोमवारी पहाटे ५ वाजून २३ मिनिट ते ६ वाजून १६ मिनिटं या वेळेत करण्यात आले आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून रोज कोटीच्या संख्येने भाविक आज दुपारपासून मोठ्या संख्येने याठिकाणी येत आहेत. त्रिवेणी संगमात कोट्यवधी लोकांकडून आस्थेची डुबकी घेतली जाते. महाकुंभात पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झाले. तर दुसरे अमृत स्नान मौनी अमावस्येदिवशी पार पडले. तर आता पुढचे तिसरे अमृत स्नान वसंत पंचमीच्या निमित्ताने होणार आहे.



भाविकांच्या सुरक्षेसह अन्य कोणत्याही पातळीवर चुकीला वाव नको - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


वसंत पंचमीच्या अमृत स्नानाच्या पर्वात भाविकांना सुरक्षित स्नान करण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार संगम तटावर २८ मोक्याची ठिकाणे बनविण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलिसांसोबतच आरएएफ आणि पॅरामिलेट्रीचे जवान यांची संयुक्त टीम घटनास्थळी तैनात असेल. पंचमी स्नान महोत्सवात कोणतीही त्रुटी न ठेवता व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिले. या प्रसंगी आखाड्यांची पारंपारिक मिरवणूक काढली जाईल. तत्पूर्वी संत, कल्पवासी, भक्त आणि पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित केली पाहिजे. कोणत्याही पातळीवर चुकीला वाव असता कामा नये, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.महाकुंभ मेळा परिसरातील पार्किंगची जागा वाढवावी. भाविकांना शक्य तितके कमी चालावे लागेल, अशी व्यवस्था करा. महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले.



महाकुंभ' चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी


प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीप्रमणी दाखल जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, ही जनहित याचिका ३ फेब्रुवारीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला होता आणि ६० जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सर्व राज्यांना प्रयागराजमधील त्यांच्या सुविधा केंद्रांमध्ये भाविकांना सुरक्षा उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल मूलभूत माहिती देण्याचे निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या खटल्यांच्या यादीनुसार, मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांचे खंडपीठ ३ फेब्रुवारी तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment