
महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे
चौदा मनूपैकी पहिला मनू, स्वयंभूव मनू व त्याची पत्नी शतरूपा यांना प्रियव्रत व उत्तानपाद अशी दोन मुले होती. राजा उत्तानपादाला सुनीती व सुरूची नावाच्या दोन राण्या होत्या. सुरूची राजाची प्रिय पत्नी होती. तिच्या मुलाचे नाव उत्तम. सुनीती नावडती होती. तिच्या मुलाचे नाव धृव (धृवबाळ) होते. एक दिवस उत्तम, उत्तानपादाच्या म्हणजे पित्याच्या मांडीवर बसला असताना ध्रुवही त्यांच्या मांडीवर बसण्यासाठी जात असताना त्याची सावत्र आई सुरुचीनी त्याला मांडीवरून ओढून अपमानित केले. तुला राजाच्या मांडीवर बसण्याची अपेक्षा असेल तर तपश्चर्या करून माझ्या पोटी जन्म घेण्याचा वर माग असे सुरुचीने म्हटले.

भालचंद्र ठोंबरे नैमिषारण्य हे भूतलावरील एक प्रतिष्ठित तीर्थस्थळ मानले जाते. या ठिकाणी ३३ कोटी देवता व ८८ हजार तपस्वी ऋषीमुनींचा वास असल्याचे मानले ...
आपल्या सावत्र मातेच्या अशा कठोर शब्दांनी दु:खी होऊन बाळ ध्रुव रडत रडतच आपल्या मातेकडे गेला. सुरुचीने मुलाच्या केलेल्या अपमानाने सुनीती अतिशय दुःखी झाली व ध्रुवाला म्हणाली तुला उत्तमप्रकारे राज सिंहासनावर बसावयाचे असल्यास भगवंताची आराधना कर. लहान असूनही मानभंग सहन न झालेल्या ध्रुवाने आईच्या सल्ल्यानुसार इष्ट ध्येयाच्या प्राप्तीचा निश्चय केला व राजमहाल सोडला. वाटेत त्याला महर्षी नारद भेटले. नारदांनी त्याला मधुवनात जाऊन भगवंताचे ध्यान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ध्रुवाने मधुवनात ध्यान धारणेला सुरुवात केली. ध्रुवाने प्रथम फळ नंतर पाणी व शेवटी केवळ श्वासावर राहून तपश्चर्या केली. नंतर आपले प्राण रोखून हरीचे ध्यान करू लागला. त्याची समष्टी प्राणाशी एकरूप झाल्याने सर्व जीवांचा श्वासही रोखल्या गेला. तेव्हा सर्व देव भगवंतांना शरण गेले. अखेर ध्रुवाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी प्रसन्न झाले. ध्रुवाने त्यांची स्तुती केली.
ध्रुवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांनी ध्रुवाला तू पृथ्वीवर ३६००० वर्षे राज्य करून अखेर जे लोक कधीही नष्ट होत नाही अशा ध्रुव लोकांत वास करशील असा आशीर्वाद दिला. तपश्चर्येनंतर ध्रुव राजधानीत यायला निघाला. ही बातमी महर्षी नारदाद्वारे आधीच उत्तानपाद राजाला कळल्याने राजा अमात्य मंत्रीगण व प्रतिष्ठित नागरिकांसह ध्रुवाच्या स्वागताला गावाच्या वेषीवर येऊन थांबले होते. मंगल वाद्यांच्या गजरात ध्रुवाचे स्वागत करण्यात आले. उत्तानपादाने अमात्य व मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून ध्रुवाचा राज्याभिषेक केला व स्वतः वानप्रस्थान स्वीकारला.
ध्रुवाचा विवाह प्रजापती शिशू माराची कन्या भ्रमीशी झाला. तिला कल्प व वत्सर नावांची मुले होती. ध्रुवाचा दुसरा विवाह वायुपुत्री इलाशी झाला. तिच्यापासून त्याला उत्कल नावाचा पुत्र व एक कन्या झाली. एके दिवशी ध्रुवाचा भाऊ उत्तम मातेसह हिमालयात गेला असता एका बलवान यक्षाकडून मारला गेला. तेव्हा चिडून ध्रुवाने मोठ्या सैन्यासह हिमालयातील घाटीतील यक्षाच्या अलकापुरीवर स्वारी केली. सर्व यक्ष ध्रुवावर तुटून पडले मात्र पराक्रमी ध्रुवाने त्यांचा पराभव केला व कित्येकांना ठार केले. तेव्हा यक्षांनी मायावी युद्ध आरंभले. ध्रुवाने नारायणास्त्राच्या साह्याने त्याचा नाश करून भयंकर उत्पात आरंभीला.
ध्रुवाने यक्षांचा केलेला संहार पाहून धृवाचे पितामह स्वयंभूव मनू प्रकट झाले व ध्रुवाला आपल्या क्रोधाला आवर घालण्यास सांगितले. एका यक्षाच्या चुकी पोटी असंख्य यक्षांची हत्या केल्याचे निदर्शनास आणून दिले व त्याबद्दल कुबेराची क्षमा मागण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ध्रुवाने कुबेराची स्तुती करून क्षमायाचना केली. कुबेराने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. ध्रुवाने श्रीहरी स्मरण नित्य राहो असा वर मागितला. अशाप्रकारे ३६ हजार वर्षे प्रजेचे सन्मार्गाने पालन करून धृव अखेर आपला मुलगा उत्कल यास राज्यकारभार सोपवून बदरीका आश्रमाकडे निघून गेला.
त्या ठिकाणी ध्यान साधनेत मग्न असतानाच श्रीहरीच्या सेवकांनी आणलेल्या विमानातून त्र्यैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळाच्याही वर असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या निजधामात पोहोचला व अशाप्रकारे अढळ पद मिळविले. भौगोलिकदृष्ट्या धृव हा चमकता तारा उत्तर गोलार्धात उत्तर दिशेला पृथ्वीपासून ४३४ प्रकाश वर्षदूर असून स्थीर आहे.