भालचंद्र ठोंबरे
नैमिषारण्य हे भूतलावरील एक प्रतिष्ठित तीर्थस्थळ मानले जाते. या ठिकाणी ३३ कोटी देवता व ८८ हजार तपस्वी ऋषीमुनींचा वास असल्याचे मानले जाते. तसेच हे स्थान ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच सतीशीही संबंधित असल्याचीही धारण आहे. पूर्वी हे एक प्राचीन अरण्य होते, याला नामसर किंवा नैमिष असेही म्हटले जाते. हे स्थान उत्तर प्रदेशात लखनऊपासून अंदाजे ९० किलोमीटर अंतरावरील सीतापूर जिल्ह्यात गोमती नदीच्या काठावर आहे. नैमिषारण्याच्या नावाच्या उत्पत्ती संबंधित विविध पुराणात विविध कथा आहेत. वराह पुराणानुसार भगवान विष्णूंनी एका “निमिषात’’ दूर्जय नावाच्या राक्षसाच्या वध केला, म्हणून याचे नाव नैमिषारण्य पडले. तर अन्य एका पुराणानुसार ८८ हजार ऋषींनी सृष्टीच्या उत्पत्तीनंतर ब्रह्मदेवाला तपासाठी योग्य भूमी देण्याची विनंती केली, तेव्हा ब्रह्माने मनाने एक चक्र उत्पन्न करून हे चक्र ज्या ठिकाणी स्थिर होईल ते ठिकाण तपासाठी योग्य असेल असे ऋषींना सांगितले. ऋषीमुनी या चक्राच्या मागोमाग जाऊ लागले. हे चक्र या ठिकाणी स्थिर झाले म्हणून याला नैमिषारण्य असे नाव पडल्याचे मानले जाते. या चक्रामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह भूतलावर आला तेच चक्र तीर्थ म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी दधीची ऋषींचा आश्रम होता. वृत्रासूर नावाच्या राक्षसाने सर्व पृथ्वी व देवतांना त्राही त्राही करून सोडले होते. दधीची ऋषींच्या हाडापासून बनलेल्या वज्रानेच त्याला मरण येईल, असे ब्रह्मदेवांनी इंद्राला सांगितले. त्यामुळे वृत्तासुराला मारण्यासाठी इंद्राला दधीचींच्या हाडांची गरज होती व त्यासाठी इंद्रानी त्यांच्या हाडांची मागणी केली. देवांच्या कल्याणासाठी दधीचींनी ही मागणी मान्य केली. त्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले व दधीचींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी पवित्र तीर्थात स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा देवांनी अनेक ठिकाणांवरून पवित्र जल आणून या ठिकाणी एकत्र केले. ते ठिकाण म्हणजे मिश्रित तीर्थ (मीश्रीख) म्हणून ओळखले जाते. दधीची ऋषींनी या ठिकाणी तीर्थात स्नान करून देह त्याग केला व इंद्राने त्यांच्या हाडापासून वज्र तयार करून वृत्तासूरचा वध केला. महर्षी व्यासांनी चार वेद व अठरा पुराणांची निर्मिती ही याच ठिकाणी केली; परंतु तरीही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांना भगवंताच्या लीला असलेले भागवत पुराण लिहिण्यास ब्रह्मदेवाने सांगितले.
प्रभू रामचंद्रांनीही येथे भेट दिल्याचे मानले जाते. येथील प्रसिद्ध स्थळांमध्ये चक्रतीर्थ व्यास गादी हनुमान गढी, पंचपांडव मंदिर, ललिता देवी मंदिर, पंचप्रयाग आदी प्रमुख ठिकाणांपैकी आहेत. नैमिषा अरण्यात श्रीमद्भागवताचे पठण व श्रवण केल्याने पुण्य प्राप्त होते. अशी प्रबळ धारणा धर्म वत्सलामध्ये आहे. सनकादिकानुसार सत्यापासून दूर गेलेले, माता-पित्यांची निंदा करणारे, कामनेनी ग्रस्त झालेले, आश्रम धर्माचे पालन न करणारे, दांभिक, इतरांचा मत्सर करणारे, त्यांना पीडा देणारे आदी सर्व प्रकारची पापे करणाऱ्यांची पापे श्रीमद्भागवतच्या सप्ताह यज्ञानिक पठण श्रवणाने पवित्र होतात. या ठिकाणी १२ वर्षे तपश्चर्या केल्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते अशीही धारणा आहे. महर्षी व्यासाचे शिष्य रोमहर्षण पूत्र सौती उग्रश्रव यांनी येथेच ऋषिमुनींना पौराणिक कथा सांगितल्याचा उल्लेख केला आहे. नैमिषारण्याचा उल्लेख रामायण व महाभारतामध्ये दोन्हीतही आढळतो.